पिझ्झा अवघ्या १५ मिनिटांमध्ये येतो. मात्र अग्निशमन दलाचे बंब ५ तास उलटून गेल्यावरही येत नाही, असे पंजाबचे मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. स्वपक्षीय आमदार नवतेज सिंग चिमा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी हे विधान केले. राज्यातील अग्निशमन दलाच्या स्थितीवर भाष्य करताना सिद्धू यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘राज्यासाठी ५५० अग्निशमन दलाचे बंब आवश्यक आहेत. मात्र सध्याच्या घडीला राज्यात अग्निशमन दलाकडे अवघी १५० वाहने आहेत,’ असे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबच्या विधानसभेत बोलताना सांगितले. ‘राज्यातील अग्निशमन दलाकडे १५० वाहने आहेत. यापैकी १०० वाहने कालबाह्य आहेत. त्यामुळे फक्त ५० वाहने पूर्णपणे कार्यक्षम आहेत,’ असेदेखील सिद्धू विधानसभेत बोलताना म्हणाले. राज्यातील अग्निशमन विभागाची ही दयनीय अवस्था लवकरच सुधारेल, असा विश्वास सिद्धू यांनी व्यक्त केला. ‘अग्निशमन संचलनालय स्थापन करुन विभागाला अत्याधुनिक साधने पुरवण्यात येतील’, असे आश्वासन पंजाबच्या विधानसभेत बोलताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिले.

यावेळी बोलताना कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आधीच्या शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. आधीच्या सरकारने अग्निशमन यंत्रणेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असे म्हणत सिद्धू यांनी म्हटले. ‘केंद्र सरकारने अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेच्या खरेदीसाठी पंजाब सरकारला ९० कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र यापैकी केवळ १७ कोटी रुपयांनी अग्निशमन सामुग्री तत्कालीन शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने खरेदी केली,’ असा आरोप सिद्धू यांनी केला.

राज्यातील अग्निशमन दलाच्या ढिसाळ कारभारावर बोलताना कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पिझ्झाचे उदाहरण दिले. ‘पिझ्झा अवघ्या १५ मिनिटांमध्ये पोहोचतो. मात्र अग्निशमन दलाचा बंब ५ तासांनंतरही पोहोचत नाही,’ अशा खोचक पद्धतीने सिद्धू यांनी अग्निशमन दलाच्या विदारक स्थितीवर भाष्य केले. अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकार ४५ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सिद्धू यांनी यावेळी सांगितले.