केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय नागरिकता नोंदणीबाबत (एनआरसी) राज्यसभेत नुकतेच जे स्पष्टीकरण दिले त्याचे योगगुरु रामदेव बाबा यांनी स्वागत केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी एनआरसी फायद्याचं असल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरुन राजकारण करता कामा नये, असा सल्लाही त्यांनी विरोधी पक्षांना दिला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

रामदेव बाबा म्हणाले, “बेकायदा पद्धतीने एखादी व्यक्ती जरी भारतात राहत असली तरी ते राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि एकतेच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे अशा लोकांपासून आपल्याला राष्ट्राचे संरक्षण करावेच लागेल. यासाठी एनआरसी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी फायद्याचे ठरेल. हा सामाजिक, राजकीय विषय नाही त्यामुळे त्यावरुन राजकारण करता कामा नये.”

अमित शाह यांनी बुधवारी राज्यसभेत एनआरसीवरुन विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना म्हटले होते की, एनआरसी कुठल्याही धर्माच्या लोकांविरोधात नाही. त्यामुळे आता ते संपूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे. शाह यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्ही पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू करणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी यावरुन घाबरण्याचे कारण नाही.

दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये एकूण ३ कोटी ११ लाख २१ हजार ००४ लोक पात्र ठरले होते. तर १९ लाख ०६ हजार ६५७ लोक या यादीत समाविष्ट होण्यात अपात्र ठरले होते. म्हणजेच त्यांची नागरिकता धोक्यात असल्याचे चित्र आहे.