भारताची धर्मशाळा होऊ देणार नाही. आगामी काळात देशातील घुसखोरी थांबवण्यासाठी आसामनंतर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स अर्थात एनआरसी कायदा देशभरात लागू करण्यात येईल, असा दावा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे.

पक्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने शिवराज सिंह चौहान तीन दिवस ईशान्येतील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. एनआरसीच्या मुद्यावर बोलताना चौहान म्हणाले, कुणीही येऊन देशात कायमच स्थायिक होत आहे. आम्ही हे बदलून टाकणार आहोत. आसाममधील एनआरसी यादी दोषमुक्त करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करीत आहोत. मात्र, घुसखोरांसाठी भारताची धर्मशाळा होऊ देणार नाही. एनआरसी फक्त आसामसाठी नाही. हा कायदा संपुर्ण देशासाठी आहे आणि भाजपा त्याची अमलबजावणी करेल, अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी गुवहाटी येथील भाजपा मुख्यालयात दिली.

मी वेगळ काही बोलत नाहीय. केंद्र सरकारने जे काही केल आहे, ते विचारपूर्वक केलेलं असुन याच मार्गाने पुढे जाणार आहे. आसाममधील वाढत्या घुसखोरीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे चौहान म्हणाले. दरम्यान, विरोधीपक्ष काँग्रेसने याविरोधात सर्वोच्च न्यायालयास पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय फायद्यासाठी भाजपा एनआरसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा उल्लघंन केले आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.