‘एनआरसी’बाबत संसद, मंत्रिमंडळात चर्चाच नाही – पंतप्रधान

राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी)संसदेतच नव्हे, तर मंत्रिमंडळातही चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रामलिला मैदानावरील जाहीर सभेत स्पष्ट केले. सुधारित नागरिकत्व कायद्यापाठोपाठ देशभर ‘एनआरसी’ राबवण्याच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याला त्यांनी छेद दिला.

देशभर ‘एनआरसी’ राबवणारच असे गृहमंत्री शहा लोकसभेत आणि झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेतही म्हणाले होते. पंतप्रधानांनी मात्र ‘एनआरसी’बाबत संसदेत चर्चा झाली नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार केवळ आसाममध्ये ‘एनआरसी’ राबवण्यात आली, असे स्पष्ट केले. ‘एनआरसी’विषयी असत्य माहिती पसरवण्यात येत असल्याचे भाष्य करत, मुळात ही कल्पना आधीच्या काँग्रेस सरकारचीच आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायदा आणि ‘एनआरसी’बद्दल भारतीय मुस्लिमांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करून मोदी म्हणाले, माझे विरोधक मला लक्ष्य करण्यासाठी लोकांना भडकावून देशात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांना स्थानबद्धता छावण्यांमध्ये (डिटेन्शन सेंटर्स) पाठवण्यात येईल, अशी अफवा काँग्रेस, काँग्रेसचे मित्रपक्ष आणि शहरी नक्षलवादी पसरवत असल्याचा आरोप मोदी यांनी केला.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात उफाळलेल्या देशव्यापी असंतोषाच्या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी या नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, सुधारित नागरिकत्व कायदा कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही, तर शेजारी देशांतील छळग्रस्त अल्पसंख्याकांना नागरिकत्वाचा हक्क देण्यासाठी आहे.

नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांवरही त्यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले, अल्पसंख्याकांबाबतचा पाकिस्तानचा भेदभाव उघडकीस आणण्याची संधी भारताला होती, परंतु विरोधकांच्या राजकारणामुळे ती गमावली गेली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या सुमारे १०० मिनिटांच्या भाषणाची सुरुवात ‘विविधतेत एकता, भारताची विशेषत:’ या घोषणेने केली. नागरिकत्व कायद्यातील सुधारणा मुस्लिमांबाबत भेदभाव करणाऱ्या असल्याच्या आरोपाबाबत, ‘माझे आतापर्यंतचे काम लक्षात घ्या, माझ्या विरोधकांचे ऐकू नका’, असे आवाहन मोदी यांनी केले. माझ्या सरकारने राबवलेल्या योजना सर्वासाठी होत्या, मग तो मंदिरात जाणारा असो वा मशिदीत, असे मोदी म्हणाले.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील निदर्शनांदम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत मोदी यांनी विरोधकांवर हल्ला केला. ते म्हणाले, हिंसाचार घडत असतानाही विरोधकांनी शांततेचे आवाहन केले नाही. शाळाबस आणि रेल्वेगाडय़ांच्या तोडफोडीला विरोधकांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, हे त्यांच्या मौनातून दिसले.

विरोधकांनी मला विरोध करण्यासाठी माझा पुतळा जाळावा, पायाखाली तुडवावा, पण इतरांच्या मालमत्ता आणि संपत्तीचे नुकसान करू नये. मुस्लीम देशांमध्ये मला पाठिंबा मिळत आहे. ते देश माझा सन्मान करत आहेत, याची काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना भीती वाटते, असे मोदी म्हणाले.

अमित शहा म्हणाले होते..

‘एनआरसी’ येणारच आहे. ‘एनआरसी’बाबत याच सभागृहात अगदी स्पष्टपणे माहिती देण्यात येईल. त्यात काहीच अडचण नाही. मात्र, ‘एनआरसी’ येणार आहे, हे गृहीत धरा.

(लोकसभेतील भाषण, १० डिसेंबर)

२०२४ च्या निवडणुकीपूर्वी देशभर ‘एनआरसी’ लागू केले जाईल. आगामी निवडणुकीपर्यंत सर्व घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्यात येईल.

(झारखंड प्रचारसभेतील भाषण, २ डिसेंबर)

विरोधात आणि समर्थनार्थ मोर्चे

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आणि समर्थनार्थ रविवारी राज्यासह देशात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. ठाणे, धारावी़, चेंबूरमध्ये या कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली. नागपूर आणि बदलापुरात या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, या कायद्याविरोधात रविवारीही दिल्लीसह देशातील अनेक भागांत निदर्शने करण्यात आली.

‘एनआरसी’ देशभर लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याशी विसंगत भूमिका पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे भारतीयत्वाच्या भूमिकेच्या विरोधात कोण जात आहे? कोण बरोबर, कोण चूक हे जनताच ठरवेल.

– ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल