अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. आज दिल्लीत पार पडलेल्या ट्रस्टच्या पहिली बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे.

याचबरोबर यावेळी अन्य देखील निवडी करण्यात आल्या, खजिनदारपदी स्वामी गोविंद देवगिरी यांची निवड केली गेली आहे. तर तयार करण्यात आलेल्या भवन निर्माण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद मिश्रा यांना देण्यात आली आहे.

या पहिल्या बैठकीत मंदिराचे बांधकाम कधीपासून सुरू करायचे आहे? याबाबत झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. तर पुढील बैठक अयोध्येत होणार असुन त्या बैठकीत मंदिर उभारणीच्या कामाची तारीख निश्चित होणार असल्याची शक्यता आहे. या पहिल्या बैठकीस एकुण १४ ट्रस्टी उपस्थित होते. अयोध्येतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ट्रस्टचे खाते उघडण्याचेही ठरले असल्याची माहिती आहे.