भारत आणि चीन यांच्यात सीमाप्रश्नासह, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्रात अडवल्याच्या मुद्दय़ासह दहशतवाद प्रतिबंधाशी संबंधित मुद्दय़ांवर दोन्ही देशांनी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी गुरुवारी दिली.
भारत व चीन दरम्यानच्या सीमाविषयक बोलण्यांची १९वी फेरी आटपून डोवल यांनी शुक्रवारी चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांची भेट घेतली, तसेच बोलण्याच्या फलश्रुतीबाबत चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जिएची यांच्याशी चर्चा केली.
डोवल यांचे स्वागत करून चिनी पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबतच्या भेटीची आठवण केली. या भेटीत दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीची चर्चा केली
होती.
या बैठकांमधून दोन्ही देशांमधील सहज संवाद तसेच राजकीय व सुरक्षाविषयक मुद्दय़ांबाबतची बांधिलकी दिसून येते. चीन व भारत यांच्या संबंधांचा स्थिर विकास होण्यास दोन्ही बाजू किती महत्त्व देतात हेही यातून दिसत असल्याचे ली म्हणाले.
यांग यांच्यासोबत झालेल्या सीमाविषयक बोलण्यांदरम्यान दोन्ही बाजूंनी सीमाप्रश्नासह दहशतवाद प्रतिबंधासारख्या इतर मुद्दय़ांवरही चर्चा केल्याचे डोवल यांनी पीटीआयला सांगितले. मसूद अझहरबाबत चर्चा झाली काय असे विचारले असता, ‘दहशतवादाच्या चर्चेत अर्थातच मसूदचाही मुद्दा होता’, असे डोवल म्हणाले.
पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख याच्या पठाणकोट हल्ल्यातील सहभागाबद्दल त्याच्यावर बंदी घालण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्रात करत असलेल्या प्रयत्नांमध्ये चीनने ‘तांत्रिक खोडा’ घातल्याबद्दल भारताने अलीकडच्या काळात चीनवर जाहीररीत्या टीका केली आहे. चीन मात्र त्याच्या भूमिकेवर ठाम असून, आपला निर्णय वस्तुस्थिती व निष्पक्षता यावर आधारित असल्याचे त्याचे म्हणणे आहे.