22 October 2020

News Flash

अजित डोवल- पाक सुरक्षा सल्लागारांच्या भेटीवर भारताचे मौन

२६ डिसेंबरला झाली होती भेट

संग्रहित छायाचित्र

सीमेवरील घुसखोरी व शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि कुलभूषण जाधव प्रकरणामुळे भारत – पाकिस्तानमधील तणाव वाढला असतानाच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासिर खान यांची भेट घेतल्याच्या वृत्तावर भारताने मौन बाळगले आहे.

पाकच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे भारत- पाकमधील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. यात भर म्हणजे सीमारेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या कारवाया वाढल्या असून पाक सैन्याच्या गोळीबारात भारतीय जवानांना जीव गमवावा लागला. एकीकडे तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे २६ डिसेंबर रोजी बँकॉक येथे ही भेट झाली होती. ही भेट पूर्वनियोजितच होती, असे सांगितले जाते.

पाकिस्तानमधील ‘द ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बँकॉकवरुन परतल्यावर नासिर खान यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. जवळपास पाच तास ही भेट सुरु होती. डोवल यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली, याची सविस्तर माहिती त्यांनी शरीफ यांना दिली. शस्त्रसंधीचे उल्लंघन, दोन्ही राष्ट्रांमधील संबंध आदी मुद्द्यांवर भारताशी चर्चा झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. मात्र, या भेटीबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही माहिती दिलेली नाही. कुलभूषण जाधव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते.

या बैठकीत अजित डोवल यांनी पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला, असे समजते. तसेच काश्मीर प्रश्न, भारत आणि पाक सीमेवरचा तणाव हे मुद्देही या बैठकीत भारताने उपस्थित केले होते. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात यावर्षी भारताचे ३१ जवान शहीद झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 2:40 pm

Web Title: nsa ajit doval meet pakistan lt general nasir khan janjua in bangkok india maintained silence
Next Stories
1 शस्त्रसंधी उल्लंघनानंतरही क्रिकेट सामन्यांची अपेक्षा कशी करता? सुषमा स्वराजांनी पाकिस्तानला फटकारलं
2 सीमारेषेवर भारत अतिआक्रमक; चीनचा कांगावा
3 कुठे मिशी नी कुठे शेपूट; काँग्रेसची मोदींशी अशी तुलना केली केंद्रीय मंत्र्याने
Just Now!
X