अज्ञात असलेल्या कुठल्याही परदेशात केलेला दूरध्वनी टिपण्याची क्षमता असलेली यंत्रणा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) विकसित केली आहे, असा गौप्यस्फोट अमेरिकेच्या माहिती चोरीची िबग फोडणारा एनएसएचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने केला आहे.
एनएसएने २००९ मध्येच अशी यंत्रणा तयार केली होती की, जिच्या मदतीने अमेरिका सरकार परदेशात केला जाणारा कुठलाही दूरध्वनी टिपून त्यातील माहिती गोळा करता येईल. अमेरिकेतील नागरी स्वातंत्र्याचा कथित पुरस्कार करणाऱ्या गटांनी स्नोडेनची ही नवीन माहिती धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. एनएसएने परदेशात केले जाणारे दूरध्वनी टिपण्यासाठी तयार केलेल्या या यंत्रणेचे नाव मायस्टीक असे असून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास अमेरिकी अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्याच्या वेष्टनावर संस्थेचा कर्मचारी व त्याच्या हातात मोबाईल असे चित्र दाखवले आहे. मायस्टीक हा अमेरिकी टेहळणी कार्यक्रमाचा एक भाग असून परदेशात केलेला कुठलाही कॉल त्यात टिपला जात असे, अशी माहिती वॉिशग्टन पोस्टने दिली आहे. व्हँकूव्हर येथे एका परिषदेत स्नोडेन याने अमेरिकेचे आणखी िबग फोडण्याचे सूचित केले होते त्यानुसार त्याने आता हा नवा गौप्यस्फोट केला आहे. अमेरिकी अधिकाऱ्याच्या विनंतीनुसार अमेरिकी वर्तमानपत्रांनी नेमक्या कुठल्या देशातील कॉल्सवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा वापरली जात होती त्या देशांची नावे प्रसिद्ध केली नाहीत.
व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी सांगितले की, आम्ही सर्वसामान्यपणे प्रत्येक विशिष्ट आरोपावर उत्तर देत नाही. कॅनडातील व्हँकुव्हर येथे टेड कॉन्फरन्समध्ये स्नोडेन हा दूरनियंत्रित रोबोटच्या रूपात आला होता.
सध्या स्नोडेनने रशियात आश्रय घेतलेला असून आपण अमेरिकी सरकारचे आणखी बिंग फोडणार आहोत, असे त्याने म्हटले आहे.