गोवा येथे शनिवारपासून ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी ब्रिक्स देशांच्या आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांना दहशतवादविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ब्रिक्स देशांनी दहशतवादाची व्याख्या ठरवण्यात वेळ घालवू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसला मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत याच मुद्दावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर परिषदेच्या अखेरच्या दिवशी (रविवारी) याबाबत काही महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक परिषद (सीसीआयटी) नवीन व्याख्येच्या तयारीत असल्याचेही समजते. यावर भारताबरोबर ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका एकत्रित काम करत आहेत.
डोवल यांच्या भुमिकेशी ब्रिक्समधील काही वरिष्ठ अधिकारी सहमत असल्याचे बोलले जाते. हा मुद्दा डोवल यांनी ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीतही उपस्थित केला होता. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत ही बैठक झाली होती. ब्राझीलमधील उफा येथे झालेल्या ब्रिक्स बैठकीत सीसीआयटी संबंधीचा विषय चर्चेसाठी नव्हता. मात्र वर्ष २०१४ पर्यंत यावर चर्चा होत होती. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीयस्तरावर एकटे पाडण्यासाठी ही चांगली पद्धत असल्याचे मानले जाते.
काय आहे सीसीआयटी
जगात दहशतवादावर एकच व्याख्या करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्व दहशतवादी संघटना, प्रशिक्षण शिबिरांवर बंदी घालण्याबाबत सांगितले आहे. सर्व दशहतवाद्यांवर विशेष कायद्यान्वये खटले दाखल करणे आणि सीमारेषेबाहेरून होणारा दहशतवादाला प्रत्यापर्ण गुन्हा मानावा असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 10:37 am