कोची : पुड्डुचेरी येथील एका प्रसिद्ध नाटय महोत्सवात सादर करण्यात आलेल्या नाटकात पुरुषांच्या नग्नतेचा समावेश असल्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी)  या संस्थेने दिग्दर्शकाला नोटीस दिली असून मोठे वादंग निर्माण झाले.

भास्करा पट्टेलारूम थोमियुडे जीविथवुम ( भास्कर पट्टेलर अँड लाइफ ऑफ थॉमी) हे त्या नाटकाचे नाव असून ते ‘भारत रंग महोत्सव ’ या आंतरराष्ट्रीय भारतीय नाटय़ महोत्सव २०२० मध्ये १२ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आले होते. ‘ब्यारी’ या चित्रपटासाठी २०११ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक सुवीरन यांनी ते दिग्दर्शित केले होते. भास्करा पट्टेलारूम एंटे जीविथवुम या प्रसिद्ध मल्याळी लेखक पॉल झचारिया यांच्या कादंबरीवर ते आधारित आहे.

सुवीरन यांना पाठवलेल्या पत्रात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने म्हटले आहे,की ज्यांनी हे नाटक पाहिले त्यांच्यापैकी अनेकांनी आक्षेप घेतले असून त्यात नग्नतेला बरेच स्थान देण्यात आले होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सोसायटीचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. नग्नता व अश्लीलता याला सार्वजनिक सादरीकरणात कायद्यानुसार बंदी असतानाही तसे करण्यात आले.

सुवीरन यांनी नोटिशीला उत्तर देताना म्हटले आहे, की जर नग्नतेमुळे नाटकाचा अनुभव जास्त संपन्न होणार असेल तर तशी दृश्ये दाखवण्यात आपल्याला काही गैर वाटत नाही. सार्वजनिक ठिकाणच्या वर्तनाचे नियम हे कलेला कसे लागू करता येऊ शकतात हे समजू शकत नाही. दिग्दर्शक  किंवा कलाकार म्हणून नोटिशीत उपस्थित केलेले मुद्दे अनाकलनीय वाटतात. ते नाटक बंदिस्त जागेत सादर केले होते, त्यात काही पाहुणे निमंत्रित होते. त्याला सार्वजनिक ठिकाण म्हणता येत नाही.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने म्हटले आहे, की हे नाटक जेव्हा डीव्हीडी रूपात आम्हाला सादर करण्यात आले तेव्हा त्यात नग्नतेशी संबंधित दृश्ये नव्हती. १२ फेब्रुवारी रोजी जे नाटक पुड्डुचेरी येथील महोत्सवात सादर केले त्यात कराराचा भंग करून नग्न दृश्ये दाखवण्यात आली. त्यासाठी परवानगी घेतली नव्हती.

सुवीरन यांनी म्हटले आहे, की नाटकाची जी डीव्हीडी सादर केली होती ती त्या नाटकाचा दर्जा कळावा यासाठी होती. नाटकांमध्ये सेन्सॉरशिप असते हे आपण कधी ऐकले नव्हते.