जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल लागवट लागू होताच केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवादी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याचं पहायला मिळत आहे. दहशतवादी घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) कमांडोंना जम्मू काश्मीरात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनएसजी कमांडो जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांना प्रशिक्षण देणार आहे. राज्यातील पोलिसांना प्रशिक्षण देण्यापासून ते दहशतवादी हल्ल्यादरम्यान परिस्थिती कशी हाताळावी याचीही माहिती एनएसजी कमांडो देणार आहेत. दहशतवाद विरोधी मोहिमेत नेहमीच चोख कामगिरी बजावणारे एनएसजी कमांडो जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त श्रीनगर विमानतळावर अँटी हायजॅक ऑपरेशनवर नजर ठेवू शकतात. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जिथे गरज असेल तिथे कमांडोंचा वापर केला जाऊ शकतो. एनएसजी कमांडोंनी याआधीही जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांना प्रशिक्षण दिलं आहे. सुरक्षा दलांसाठी चकमकीदरम्यान नेहमीच करो वा मरो परिस्थिती असते. गेल्या काही दिवसांत चकमकींची संख्या वाढली असून, रहिवासी परिसरात झालेल्या चकमकींमुळे अनेक जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीतच एनसजी कमांडोंना काश्मीरमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.