यंदाच्या जेईई (JEE) मुख्य आणि नीट (NEET) परीक्षा या यापूर्वी जाहीर केलेल्या तारखांप्रमाणेच होतील अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) केली आहे. त्यामुळे आता जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होईल. यापूर्वी या परीक्षा जुलै महिन्यात होणार होत्या मात्र, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळं ती स्थगित करण्यात आली होती.

NTA ने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विद्यार्थ्यांचे हित लक्षात यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांना स्थगिती देण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा यासाठी हवाला देण्यात आला आहे.

त्याचबरोबर NTAने लवकरच विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देण्याचे आश्वासनही दिले आहे. तसेच उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना पहिलेच केंद्र देण्याचा ९९ टक्के प्रयत्न करण्यात येईल, असेही NTAने स्पष्ट केले आहे.