गेल्या महिन्यात १३ मे रोजी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित केलं. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटानं केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं देखील सांगितलं गेलं. पण आता त्याच वैज्ञानिकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या ३ सदस्यांनी केला आहे. रॉयटर्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणाच्या सल्ल्यावरून झाला निर्णय?

एकीकडे देशात लसींचा तुटवडा असल्याचं समोर येत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ करण्याचा निर्णय जाहीर केला. यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या गटाने अंतर वाढवण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून हा निर्णय घेतल्याचं देखील जाहीर करण्यात आलं. या गटाने अंतर दुप्पट करण्याला कधीही समर्थन दिलं नव्हतं, असा खुलासा यापैकी काही तज्ज्ञांनी केला आहे.

अंतर १२ आठवड्यांपेक्षा जास्त झालं तर…!

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते रॉयटर्सशी बोलताना म्हणाले, “NTAGI च्या वैज्ञानिकांनी ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील याचा सल्ला दिला आहे. पण १२ ते १६ आठवडे हे केंद्र सरकारचे आकडे आहेत. दोन डोसमधलं अंतर १२ आठवड्यांपेक्षा जास्त झालं तर १२ आठवड्यांनंतर कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात, याचा कोणताही डाटा NTAGI कडे नाही”, असं गुप्ते म्हणाले आहेत. NTAGI मधलेच दुसरे सदस्य मॅथ्यु वर्गेसी यांनी देखील गुप्तेंच्या दाव्याला दुजोरा दिला. “NTAGI नं फक्त ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवावं असा सल्ला दिला होता”, असं ते म्हणाले.

Covishield च्या दोन डोसमधलं अंतर कमी होणार? केंद्र सरकारने दिलं स्पष्टीकरण!

१२ ते १६ आठवडे करा असं म्हटलोच नाही!

NTAGI मधील अजून एक सदस्य जे. पी. मुलीयिल यांनी देखील याला दुजोरा दिला. “या तज्ज्ञांच्या गटामध्ये दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत चर्चा तर झाली. पण आम्ही कधीही ते १२ ते १६ आठवडे करावं असं म्हणालो नाहीत. नेमके आकडे सांगितलेच गेले नव्हते”, असं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशातील अनेक घटकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. लसींच्या तुटवड्यामुळे असा निर्णय घेतल्याचा आरोप झाला. मात्र, हा निर्णय लसींच्या तुटवड्यमुळे नसून तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या शिफारशींनुसार घेण्यात आला आहे, असं केंद्राकडून त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

“लसीकरणातील दिरंगाईसाठी मी देशाची माफी मागतो”, पंतप्रधानांनीच मागितली माफी!

दरम्यान, केंद्र सरकारच्या करोना हाताळण्याच्या पद्धतीवर टीका करत सरकारने नेमलेल्या गटामधून बाहेर पडलेले भारताचे अग्रणी वायरोलॉजिस्ट शाहीद जमील यांनी देखील यावर तीव्र आक्षेप घेतला होता. “दोन डोसमधलं अंतर दुप्पट करण्याच्या निर्णयामागची कारणं संबंधित यंत्रणांनी स्पष्ट करावीत. ज्या काळात करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्या काळात आपण मोठ्या प्रमाणावर लोकांना लसीकृत करायला हवं”, असं ते म्हणाले आहेत.

 

NTAGI प्रमुखांची मात्र उलट भूमिका!

एकीकडे NTAGI मधील काही वैज्ञानिकांनी दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा सल्ला दिला नसल्याचा दावा केला असताना दुसरीकडे याच गटातील प्रमुख एन. के. अरोरा यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. “कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ करण्याच्या निर्णयामागे वैज्ञानिक आधार होता”, असा दावा अरोरा यांनी केला आहे. अंतर वाढवण्याविषयी गटामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते, असं देखील अरोरा म्हणाले आहेत. त्यामुळे नेमकं हा निर्णय घेताना घडलं काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ntagi scientists claim not supported doubling of vaccine dose gap pmw
First published on: 16-06-2021 at 00:47 IST