अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील जंगलांना लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ४२ वर गेली आहे. त्यामुळे राज्याच्या इतिहासातील ही सर्वात विनाशकारी आग ठरली आहे.

कॅलिफोर्नियातील सिएरा नेव्हाडा डोंगरांच्या पायथ्याजवळ असलेल्या जंगलांना लागलेली आग विझवण्याचे गेले पाच दिवस प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. या वणव्याला कॅम्प फायर असे नाव देण्यात आले आहे. आगीजवळच्या प्रदेशात ताशी १०० किमी वेगाने वारे वाहत असल्याने आग वेगाने पसरत आहे. धुराचे लोट अनेक किलोमीटरवर पसरल्याने संपूर्ण परिसर झाकोळला असून सूर्यदर्शन होणे कठीण झाले आहे. धुराने श्वास घेण्यास त्रास होत आहे.

आगीच्या प्रकोपाने पॅराडाइज शहरातील ६५०० हून अधिक घरे आणि दुकाने भस्मसात झाली आहेत. मंगळवारी आणखी १३ जणांचे मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा ४२ वर गेला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. मालिबू शहराला आगीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शेकडो नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे ५१०० हून अधिक कर्मचारी, अग्निशामक वाहने, हेलिकॉप्टर यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.