करोना विषाणूच्या संसर्गाने अमेरिकेत आतापर्यंत चार हजारावर बळी गेले असून ९/११ च्या हल्ल्यापेक्षाही बळींची संख्या अधिक झाली आहे. अमेरिकेत १ ते २ लाख लोक करोनाच्या साथीत मरतील असा अंदाज वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या करोना माहिती केंद्राने म्हटले आहे की, अमेरिकेत चार हजारावर बळी गेले असून १ लाख ९० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. मंगळवारी अमेरिकेतील मृतांच्या आकडय़ाने ९/११ हल्ल्यातील मृतांची संख्या ओलांडली आहे. अल काईदाने केलेल्या त्या हल्ल्यात अमेरिकेत २००१ मध्ये अंदाजे तीन हजार बळी गेले होते.

अमेरिकेत मरण पावलेल्यांची संख्या चीनमध्ये करोनाने घेतलेल्या बळींपेक्षा अधिक झाली आहे. चीन हे या विषाणूचे प्रमुख केंद्र होते. तेथील बळींची संख्या ३३१० होती. जगात या विषाणूने ४२ हजार बळी घेतले असून ८ लाख ६० हजार निश्चित रुग्ण आहेत. चीनमध्ये ८२२९४ रुग्ण असून तो आता चौथ्या क्रमांकावर गेला आहे. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, पुढील दोन आठवडे महत्त्वाचे असून कुठल्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास सज्ज रहावे लागेल. अतिशय वेदनादायी असे पुढील दोन आठवडे असतील. आम्ही बराच अभ्यास करून काही अंदाज वर्तवले आहेत. करोना दलाच्या सदस्य देबोरा बिक्स यांनी म्हटले आहे की, कितीही कठीण र्निबध लागू केले तरी १ ते २ लाख बळी जाण्याची शक्यता आहे. जर काहीच उपाययोजना केल्या नाहीत तर मृत्यूची संख्या १५ ते २२ लाख राहील.