देशात एका महिन्यात जवळपास १० लाख जणांना करोनाची लागण झाल्याने देशातील करोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी एक कोटीचा टप्पा ओलांडला. असे असले तरी करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले असून ९५.५० लाख जण करोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ७ ऑगस्ट रोजी २० लाखांचा टप्पा ओलांडला होता तर २३ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी ही आकडेवारी अनुक्रमे ३० लाख आणि ४० लाख इतकी होती. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी करोनाबाधितांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आणि २० नोव्हेंबर रोजी ही संख्या ९० लाखांच्या पलीकडे गेली.

सध्या देशातील करोनाबाधितांची संख्या एक कोटी चार हजार ५९९ वर पोहोचली आहे तर गेल्या २४ तासांत आणखी ३४७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार १३६ वर पोहोचली आहे. तथापि, कोविड-१९मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १.४५ टक्क्यांवर आले आहे. देशात ३० जानेवारी रोजी केरळमध्ये पहिला करोनाबाधित आढळला तर १० मार्च रोजी करोनामुळे कर्नाटकमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली.