देशातील करोनाबाधितांच्या संख्येत केवळ १५ दिवसांत सुमारे १५ लाखांची भर पडली असून, करोनाबाधितांची एकूण संख्या दीड कोटींच्या पार गेली आहे. याच वेळी, करोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येने १९ लाखांचा आकडा ओलांडला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले.

गेल्या २४ तासांत करोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत २,७३,८१० इतकी विक्रमी भर पडल्याने देशातील करोनाबाधितांचा आकडा १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर पोहोचला. याच कालावधीत १६१९ लोक मृत्युमुखी पडल्याने करोनामृत्यूंची संख्या १,७८,७६९ इतकी झाली.

देशातील करोनाबाधितांच्या संख्येने १ कोटीचा टप्पा १९ डिसेंबरला ओलांडला होता. यानंतर ५ एप्रिल रोजी सव्वा कोटीचा टप्पा गाठण्यासाठी त्याला १०७ दिवस लागले. तथापि, दीड कोटींचा टप्पा त्याने त्यानंतर केवळ १५ दिवसांत गाठला. करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या सलग ४०व्या दिवशी वाढत जाऊन ती १९,२९,३२९ वर पोहोचली. हे प्रमाण एकूण करोनाबाधितांच्या १२.८१ टक्के आहे. तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण घसरून ८६ टक्क्यांवर आले आहे. करोनातून बरे झालेल्यांची संख्या १,२९,५३,८२१ इतकी झाली असून, मृत्युदर १.१९ टक्क्यांपर्यंत घसरला आहे, असे ही आकडेवारी दर्शवते.

करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या १,७८,७६९ लोकांपैकी सर्वाधिक ६०,४७३ महाराष्ट्रातील असून, त्याखालोखाल कर्नाटक (१३३५१), तमिळनाडू (१३११३), दिल्ली (१२१२१), पश्चिम बंगाल (१०५६८), उत्तर प्रदेश (९८३०), पंजाब (७९०२) व आंध्र प्रदेश (७४१०) यांचा क्रमांक आहे.

करोनायोद्ध्यांना २४ एप्रिलनंतर विम्याचे नव्याने संरक्षण

*  प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत करोनायोद्ध्यांचे विमाविषयक सर्व दावे २४ एप्रिलपर्यंत निकाली काढण्यात येतील व त्यानंतर त्यांना

नवी विमा पॉलिसी देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले.

*  नव्या धोरणात ‘करोनायोद्ध्यांना’ संरक्षण दिले जाईल. यासाठी मंत्रालयाची न्यू इंडिया अ‍ॅश्युअरन्स कंपनीसोबत बोलणी सुरू आहेत, असे मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये सांगितले.

*  ‘विमान कंपनीने आतापर्यंत २८७ दाव्यांची रक्कम दिलेली आहे. कोविड-१९ शी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य उंचावण्यात या योजनेने महत्त्वाची अशी मानसशास्त्रीय भूमिका बजावली आहे’, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

*  प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजमधील (पीएमजीकेपी) करोनायोद्ध्यांच्या विमा पॉलिसींच्या दाव्यांचा २४ एप्रिल २०२१ पर्यंत निपटारा करण्यात येईल व त्यानंतर करोनायोद्ध्यांसाठी नवी विमा पॉलिसी अंमलात येईल, असेही मंत्रालयाने सांगितले.

*  पीएमजीकेपी गेल्या वर्षी मार्चमध्ये जाहीर करण्यात आले होते व त्याला २४ एप्रिलपर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली, याचाही मंत्रालयाने उल्लेख केला. कोविड-१९ च्या दिवसांमध्ये करोनायोद्ध्यांबाबत काही विपरीत घडल्यास त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जावी यासाठी त्यांना

संरक्षक कवच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ते सुरू करण्यात आले होते. या योजनेंतर्गत करोनायोद्ध्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात येते.