वुहानमध्ये रुग्णालयाच्या संचालकाचा मृत्यू

चीनमध्ये करोना संसर्गाचा प्रसार वेगाने होत असून, आतापर्यंत बळींची संख्या १८०० वर पोहोचली आहे. करोना विषाणूचे केंद्रस्थान ठरलेल्या वुहान येथील रुग्णालयाच्या संचालकाचा संसर्गाने मृत्यू झाला आहे.

वुहानमधील वुचांग रुग्णालयाचे संचालक लिउ झिमिंग यांचा मंगळवारी सकाळी करोना संसर्गाने मृत्यू झाल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली. एखाद्या रुग्णालयाचे संचालक करोना विषाणूचे बळी ठरल्याची ही पहिलीच घटना आहे. चिनी माध्यमांनी आधी प्रसारित केलेली ही बातमी नंतर हटविण्यात आली.

विषाणूने आतापर्यंत इतर सहा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बळी घेतले असून, देशातील मृतांची संख्या १८६८ वर पोहोचली आहे. याआधी करोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणारे नेत्ररोगतज्ज्ञ ली वेनलिंयांग यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमीही दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वुहानमध्ये आता मास्क व संरक्षक पोशाखाची टंचाई आहे. अनेक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास होत आहे.