देशात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ८४ पर्यंत पोहोचली असून, त्यात दिल्ली व कर्नाटकातील दोन करोनाबळींचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. करोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे.

उत्तर प्रदेशातील ५ आणि राजस्थान व दिल्लीतील प्रत्येकी एक अशा ज्या सात जणांची चाचणी सकारात्मक आली होती, त्यांना उपचारांनंतर सुट्टी देण्यात आली असल्याचेही मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दिल्लीतील ६ आणि उत्तर प्रदेशातील ११ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर कर्नाटकात करोनाचे ६ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात १४ जणांना, लडाखमध्ये तिघांना, तर जम्मू-काश्मीरमध्ये दोघांना ही लागण झाल्याचे आढळले आहे. याशिवाय राजस्थान, तेलंगण, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये करोनाच्या प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

केरळमध्ये करोनाची १९ प्रकरणे नोंदवली गेली असून, त्यात गेल्या महिन्यात या संसर्गजन्य रोगातून बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आलेल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

सार्क देशांची आज व्हिडीओ कॉन्फरन्स

करोनाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त रणनीती ठरविण्याबाबत रविवारी सार्क देशांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.