देशात रुग्णवाढ कायम; मात्र इतर देशांच्या तुलनेत मृत्यूप्रमाण कमी

देशातील करोना रुग्णांची संख्या मंगळवारी दोन लाखांवर पोहोचली. त्यातील जवळपास एक लाख रुग्णांची नोंद गेल्या १५ दिवसांत झाली आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के असून, इतर देशांच्या तुलनेत मृतांचे प्रमाण कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे.

देशात गेल्या २४ तासांत ८,१७१ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १ लाख, ९८ हजार ७०६ इतकी झाल्याचे मंगळवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले होते. मात्र, मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत विविध राज्यांनी नोंद केलेल्या रुग्णांची संख्या एकत्रित केली असता देशातील रुग्णसंख्या २,००,३२१ वर पोहोचली. तसेच देशभरातील मृतांची एकूण संख्या ५,७३९ नोंदविण्यात आली.

राज्यांकडून आकडेवारीची नेमकी माहिती

राज्यांकडून करोना रुग्णांची नेमकी संख्या केंद्राला दिली जात नाही, असा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आतापर्यंत केंद्र व राज्ये एकत्रित काम करत आली आहेत. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ  नये. राज्यांनी करोना रुग्णांची संख्या लपवलेली नाही. राज्यांकडून रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार त्याची वर्गवारीही केली जात आहे, असे अगरवाल म्हणाले.

प्रतिदिन १.२० लाख चाचण्या

देशात प्रतिदिन १.२० लाखांहून अधिक करोना चाचण्या घेतल्या जात आहेत. ४७६ सरकारी व २०५ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये चाचण्या होत आहेत. नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी अन्य पद्धतींचाही वापर करण्यात येत आहे. देशांतर्गत कोणत्या कंपन्या चाचणीसंचांचे उत्पादन करू शकतात, याची आता माहिती असल्याने गरजेनुसार संचांचा पुरवठा होऊ  शकतो, असे ‘आयसीएमआर’च्या निवेदिता गुप्ता यांनी सांगितले.

भारताची स्थिती चांगली : आयसीएमआर

भारतात करोनाच्या महासाथीने अजून तरी शिखर गाठलेले नाही. अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) निवेदिता गुप्ता यांनी सांगितले. देशभरात प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे तसेच, मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश आले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र, देशात समूह संसर्ग झाला असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने समूह संसर्ग हा शब्दप्रयोग करणे टाळले आहे. केंद्र सरकारनेही समूह संसर्ग झाल्याचे नाकारले आहे. समूह संसर्ग हा शब्द वापरण्यापेक्षा करोनाचा प्रादुर्भाव किती झाला आहे हे पाहणे अधिक गरजेचे आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरलेले आहेत. मृत्यूदर कमी करण्यातही भारताला यश आले आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

७३ टक्के मृत रुग्णांना अन्य आजार

देशात करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण २.८२ टक्के असून जगभरातील सरासरीपेक्षा हे प्रमाण खूप कमी आहे. करोनाबाधितांमध्ये ७३ टक्के मृत्यूंमध्ये रुग्णांना अन्य गंभीर आजार असल्याचे आढळून आले आहे. देशात वयोवृद्धांची संख्या १० टक्के असून करोनामुळे झालेल्या प्रत्येक दोन मृत्यूंमध्ये एक वयोवृद्ध आहे, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के

आतापर्यंत देशभरात ९५,५२७ करोना रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच एकूण रुग्णांपैकी निम्मे बरे होत आहेत. हे प्रमाण १८ मे रोजी ३८.२९ टक्के, ३ मे रोजी २६.५९ टक्के तर १५ एप्रिल रोजी ११.४२ टक्के होते, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली.