देशातील करोनाच्या रुग्णसंख्येने बुधवारी ५० लाखांचा टप्पा पार केला. त्यातील दहा लाख रुग्ण गेल्या ११ दिवसांत आढळले आहेत.

गेल्या २४ तासांत करोनाचे ९० हजारांहून अधिक रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५०,२०,३५९ वर पोहोचली. दिवसभरात १,२९० रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची एकूण संख्या ८२,०६६ झाली आहे. देशात आतापर्यंत ३९,४२,३६० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात जवळपास ८३ हजार रुग्ण करोनामुक्त झाले.

सुरुवातीला देशाची रुग्णसंख्या ११० दिवसांत एक लाखापर्यंत गेली होती. त्यानंतर पुढील ५९ दिवसांत ती १० लाखांपर्यंत पोहोचली. करोनाबाधितांची संख्या २१ दिवसांत दहा लाखांवरून २० लाखांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पुढील १६ दिवसांत ती आणखी दहा लाखांनी वाढून ३० लाखांवर आणि त्यापुढील १३ दिवसांत रुग्णसंख्येने ४० लाखांचा टप्पा गाठला. मात्र, ४० लाख ते ५० लाख हा टप्पा गाठण्यासाठी अकरा दिवस लागले.

करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी देशातील मृत्युदरात घसरण नोंदविण्यात येत आहे. देशातील करोना मृत्युदर १.६३ टक्के आहे. देशभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या ९,९५,९३३ असून, हे प्रमाण १९.८४ टक्के आहे. देशभरात रोज दहा लाखांहून अधिक करोना चाचण्या करण्यात येत आहेत. मंगळवारी ११,१६,८४२ चाचण्या करण्यात आल्या होत्या.

राज्यात २३,३६५ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात चोवीस तासांत २३,३६५ नवे रुग्ण आढळले असून, ४७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील करोनाबाधितांची एकू ण संख्या ११ लाखांच्या पुढे गेली असून, सुमारे तीन लाख रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्ह्य़ात करोनाबाधित तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही जास्त आहे. सध्या पुणे जिल्ह्य़ात ८२,१७२ रुग्ण उपचाराधीन आहेत.  नागपूरमध्ये २१,५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात नाशिक शहरात ६१०, नगर ११२७, जळगाव ७६९, पुणे शहर २१४१, पिंपरी-चिंचवड ११४७, उर्वरित पुणे जिल्ह्य़ात १७६१, साताऱ्यात ८६२, कोल्हापुरात ७३७, नागपूरमध्ये २२०० रुग्ण आढळले आहेत.