वाघांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून गेल्या पाच वर्षांत मध्य प्रदेशात तब्बल ५८ वाघ मरण पावले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. शिकारी तसेच अन्य कारणांमुळे वाघांचे मृत्यू ओढवले आहेत. ५८ पैकी ९ वाघ हे शिकारीमुळे मरण पावले, तर ४९ वाघ हे अन्य कारणांमुळे मृत्युमुखी पडले.
२००९ मध्ये सर्वाधिक १८ वाघा मरण पावले, तर २०१० मध्ये १२, २०११ मध्ये ९ आणि जानेवारी ते मे २०१३ या सहा महिन्यांत सहा वाघ मरण पावले आहेत, अशी आकडेवारी वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांना माहितीच्या अधिकाराखाली वन विभागाकडून प्राप्त झाली आहे.
२००९ ते २०१२ या कालावधीत शिकारीच्या प्रत्येकी तीन घटनांमध्ये वाघ मरण पावले असून २०१०, २०११ आणि फेब्रुवारी २०१३ मध्ये शिकारीच्या प्रत्येकी एका घटनेमध्येही वाघ मरण पावले. जवळपास पाच वाघांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाला असून तीन वाघ विषबाधेमुळे मरण पावल्याची माहिती उघडकीस आली आहे. शिकाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात अडकून जखमी झालेल्या वाघिणीचाही नंतर मृत्यू ओढवला अशी माहिती दुबे यांना माहितीच्या अधिकाराखाली देण्यात आलेल्या उत्तरात मिळाली.
अन्य ४९ वाघांचा मृत्यू अपघात, न्यूमोनिया, म्हातारपणामुळे झाल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशमध्ये बांधवगड, कान्हा, पन्ना, बोरी-सातपुरा, संजय दुबरी आणि पेंच अशी वाघसंरक्षित जंगले असून सर्व मिळून २५७ वाघ आणि वाघांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. २०१० सालच्या माहितीनुसार देशात वाघांची संख्या अंदाजे १,७०६ आहे.