24 February 2021

News Flash

ऐतिहासिक छायाचित्रातील ‘तिचे’ अमेरिकेत ९२व्या वर्षी निधन

जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करल्याची बातमी टाइम्स चौकातील फलकावर झळकली

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करल्यानंतर न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात साजऱ्या झालेल्या विजयदिनी एका नाविकाबरोबर चुंबन घेताना टिपलेल्या छायाचित्रामुळे जगप्रसिद्ध झालेल्या परिचारिकेचे अमेरिकेत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रसिद्ध छायाचित्रकार आल्फ्रेड आयसेनस्टीट यांनी १४ ऑगस्ट १९४५ रोजी हा क्षण टिपला तेव्हा त्यातील परिचारिका ग्रेटा झिमर फ्रिडमन २१ वर्षांच्या होत्या. व्हर्जिनियातील रिचमंड येथील रुग्णालयात त्यांचे गुरुवारी निधन झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव जोशुआ फ्रिडमन यांनी दिली.

त्या दिवशी जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करल्याची बातमी टाइम्स चौकातील फलकावर झळकली आणि आसपासची उपाहारगृहे, दुकाने, चित्रपटगृहे आदींतून बाहेर पडत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे विजयाचा जल्लोश व्यक्त केला. त्याच दरम्यान ग्रेटा फ्रिडमन यांना जॉर्ज मेंडोसा या नाविकाने आपल्या कवेत घेऊन आवेगाने एक रसरशीत चुंबन घेतले आणि हा क्षण आयसेनस्टीट यांच्या कॅमेऱ्यात कायमचा कैद होऊन त्याला इतिहासाचे कोंदण लाभले. हे छायाचित्र सर्वप्रथम ‘लाइफ’ नियतकालिकात छापून आले आणि लवकरच ते जगभरात प्रसिद्ध झाले. ‘व्ही-जे डे इन टाइम्स स्क्वेअर’ किंवा ‘द किस’ नावाने ओळखले गेलेले हे छायाचित्र विसाव्या शतकातील मोजक्या गाजलेल्या छायाचित्रांपैकी एक म्हणून गणले जाते.

छायाचित्रात दोघांचेही चेहरे फारसे स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे आजवर अनेकांनी ते आपणच असल्याचा दावा केला आहे. ‘लाइफ’च्या ऑगस्ट १९८० च अंकात ११ पुरुष आणि तीन स्त्रियांनी ते आपणच असल्याचे म्हटले होते. मात्र कालांतराने छायाचित्रातील जोडी ग्रेटा फ्रिडमन आणि जॉर्ज मेंडोसा यांची असल्याचे सिद्ध झाले.

या छायाचित्रावर आधारित ‘द किसिंग सेलर: द मिस्टरी बिहाइंड द फोटो दॅट एंडेड वर्ल्ड वॉर टू’ या पुस्तकाचे सहलेखक लॉरेन्स व्हेरिया यांनी म्हटले आहे की, ग्रेटा यांचे आई-वडील नाझी जर्मनीत झालेल्या वंशविच्छेदात मारले गेले. पंधरा वर्षांच्या ग्रेटा यांनी ऑस्ट्रियातून पळ काढून अमेरिकेत आश्रय घेतला. तेथे युद्धकाळात त्या दंतवैद्यक साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. हे छायाचित्र घेतले गेले तेव्हा त्या आणि जॉर्ज आयुष्यात प्रथमच एकमेकांसमोर येत होते. त्यांचा कसलाही परिचय नव्हता. वास्तविक जॉर्ज रिटा पेट्री नावाच्या दुसऱ्या एका परिचारिकेबरोबर ‘डेट’वर तेथे आले होते. त्याच वेळी जपानच्या शरणागतीची बातमी फलकावर झळकली आणि त्यांनी उत्स्फूर्त आवेगाने ग्रेटा यांना मिठीत घेऊन चुंबन घेतले. काही छायाचित्रांत मागे पेट्रा स्मितहास्य करताना दिसतही आहेत.

फ्रिडमन यांनी २००५ साली ‘व्हटेरन्स हिस्टरी प्रोजेक्ट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘‘तो काही फार रोमँटिक म्हणावा असा क्षण नव्हता किंवा त्या चुंबनात तशी भावनाही नव्हती. तो निव्वळ विजयाचा जल्लोश होता.’’ मात्र आपल्या आईला तो क्षण जसाच्या तसा आठवत होता आणि त्यांनी त्याचे न अडखळता वर्णन केल्याचे ग्रेटा यांचे चिरंजीव जोशुआ यांनी सांगितले. जॉर्ज यांनीही केवळ परिचारिकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसे केले असावे असे सांगितले जाते.  ग्रेटा फ्रिडमन यांचे त्यांचे दिवंगत पती डॉ. मिशा फ्रिडमन यांच्या कबरीशेजारी आर्लिग्टन दफनभूमीत दफन केले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 1:21 am

Web Title: nurse in iconic times square sailor kiss photo dead at 92
Next Stories
1 कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर ८.६ टक्के व्याज मिळण्याची शक्यता
2 काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला
3 सरसंघचालक चुकू शकतात!
Just Now!
X