प्रसिद्ध उद्योजक नसली वाडिया यांनी टाटा सन्सला अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे. टाटा समुहातील काही कंपन्यांवर स्वतंत्र संचालक असलेल्या वाडिया यांनी सोमवारी रात्री उशिरा ही नोटीस पाठविल्याचे समजते. या नोटीशीद्वारे नसली वाडिया यांनी टाटा सन्सने आपल्याविरोधात केलेले बदनामीकारक आणि अब्रुनुकसानीकारक आरोप तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, टाटा सन्सला अशाप्रकारची नोटीस मिळाल्याच्या माहितीला सूत्रांकडून दुजोरा देण्यात आलेला आहे. आम्ही या नोटीसीला योग्य ते उत्तर देऊ असे टाटा सन्सच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांचे समर्थन केल्याच्या आरोपावरून नसली वाडिया यांनादेखील टाटा समुहातील कंपन्यांच्या संचालक मंडळातून काढून टाकण्यात आले होते. यामध्ये इंडियन हॉटेल्स, टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या संचालक मंडळाचा समावेश होता. त्यामुळे माझी वैयक्तिक आणि व्यवसायिक प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत वाडिया यांनी टाटा सन्सला ही कारवाई मागे घेण्यास सांगितले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे वाडिया यांनी टाटा सन्सला पाठविलेल्या नोटीशीत म्हटले आहे.

उचलबांगडी केले गेलेले अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि टाटा सन्समधील संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने मिस्त्री यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तबासाठी आपल्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा येत्या १३ डिसेंबरला बोलावत असल्याचे जाहीर केले आहे. टाटा समूहातील या कारणासाठी सभा बोलावणारी ही पहिलीच कंपनी असून, टाटा केमिकल्स आणि इंडियन हॉटेल्स कंपनी लि. या अन्य कंपन्यांकडूनही असेच पाऊल टाकले जाणे अपेक्षित आहे. टीसीएस ही टाटा समूहातील अग्रणी कंपनी असून, गेल्या आठवडय़ात टाटा सन्सने विशेष अधिकार वापरून सायरस मिस्त्री यांना या कंपनीच्या अध्यक्षपदावरून दूर करून, त्यांच्या जागी इशात हुसैन यांची हंगामी नियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले. याच निर्णयावर भागधारकांच्या मंजुरीची मोहोर उमटविण्यासाठी १३ डिसेंबरला या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.