पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पती निखिल जैन यांच्यासोबत त्यांचं बिनसल्याची चर्चा सुरूवातीला सुरू होती. त्यानंतर आमचं लग्नच भारतीय कायद्याच्या चौकटीत अवैध असल्याचं सांगत नुसरत जहां यांनी गौप्यस्फोट केला होता. नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद आता थेट संसदेत पोहोचला आहे. भाजपाचे खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करत मोठी मागणी केली आहे.

भाजपाचे खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. मौर्य यांनी लग्नाच्या मुद्द्यावरून नुसरत जहां यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. नुसरत जहां यांची वर्तणूक मर्यादेचा भंग करणारी असून, त्यांनी लग्नाचा विषय आपल्या मतदारांपासून लपवून ठेवला. याचा संसदेच्या प्रतिष्ठेवरही धूळ उडाली आहे. हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवण्यात यावं. याची चौकशी करून नुसरत जहां यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी खासदार मौर्य यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- “निखिल जैनशी झालेला विवाह भारतीय कायद्याच्या दृष्टीनं अवैध”, नुसरत जहाँचा खुलासा!

भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी नुसरत जहां यांच्या लग्नाबद्दलही काही बाबी पत्रातून मांडल्या आहेत. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नुसरत जहां पहिल्या दिवशी सभागृहात नवरीप्रमाणे तयार होऊन आल्या होत्या. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा नुसरत जहां यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाल्या होत्या, असा उल्लेखही मौर्य यांनी केला आहे.

हेही वाचा- अभिनेत्री नुसरत जहाँच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा! पती निखिल जैन अजूनही अनभिज्ञ?

लग्नाच्या मुद्द्यावर नुसरत जहां काय म्हणाल्या होत्या?

नुसरत जहाँ यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर खुलासा केला होता. त्यांनी ७ मुद्द्यांच्या माध्यमातून निवेदनच काढलं होतं. त्यामध्ये त्यांनी “निखिल जैनसोबत झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध होता”, असा खुलासा केला होता. तसेच, हा विवाह तुर्की कायद्यानुसार करण्यात आला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध आहे, असं देखील त्या म्हणाल्या होत्या.