अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेल्या स्नोझिला हिमवादळाचे थैमान सुरूच असून आतापर्यंत १८ जणांचे बळी गेले आहेत. काल लाखो घरातील वीज पुरवठा खंडित झाला होता, या वादळाने अनेक भागातील जनजीवन ठप्प झाले आहे. रात्रीतून वादळाचा जोर कमी झाला असून त्यामुळे न्यूयॉर्कमधील लोकांना दिलासा मिळाला. न्यूयॉर्क, लाँग आयलंड व न्यूजर्सी येथील प्रवास बंदी उठवण्याचा विचार अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. हिम वादळामुळे दहा राज्यात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे.
कटिबंधीय स्वरूपाच्या वादळात अमेरिकेच्या ईशान्य भागाला पूर्णपणे फटका दिला असून आतापर्यंत तीन फूट जाडीचा बर्फाचा थर साठला आहे. ८.५ कोटी लोकांचे जनजीवन या वादळाने विस्कळित झाले त्यात न्यूयॉर्क व वॉशिंग्टन या शहरांचा समावेश आहे. तेथे अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली. हवामानाशी संबंधित घटनात १८ जण ठार झाले असून न्यूयॉर्कमध्ये मोटारी चालवण्यास बंदी घातली आहे, मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. न्यूयॉर्कचे महापौर बिल द ब्लासियो यांनी सांगितले की, आपत्कालीन वाहने वगळता कुणी गाडय़ा चालवल्यास त्यांना अटक केली जाईल. न्यूयॉर्कच्या लोकांनी आता घरी जावे, रस्त्यावर गाडय़ा चालवू नये, त्यामुळे आम्हाला आमचे काम करता येईल, आताची स्थिती प्रवासास अयोग्य आहे. वादळ जाईपर्यंत सुरक्षित रहावे यासाठी हा इशारा देण्यात येत आहे. वॉशिंग्टन येथे मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. न्यूजर्सी येथे किनारी भागात पूर आला त्यामुळे गव्हर्नर ख्रिस ख्रिस्ती यांनी आपत्कालीन योजना जाहीर केली आहे. पूर्व किनाऱ्यावरील लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. रस्त्यावरील बर्फ काढण्यास काही दिवस लागणार आहेत.

अलास्काला ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप
वॉशिंग्टन : दक्षिण अलास्काला रविवारी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्यात जीवित किंवा वित्तहानी झाली का, याबाबत अद्याप कळू शकेलेले नाही.भारतीय वेळेनुसार दुपारी चार वाजता हा भूकंप झाला. त्याचे केंद्र ८३ कि.मी अंतरावर ओल्ड इलियाम्ना येथे होते, असे अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे. भूकंपाचे अनेक धक्के बराच वेळ जाणवले, असे अनेक नागरिकांनी ट्विटरवर म्हटले आहे.