बेहिशेबी संपत्ती प्रकरणी शिक्षा झाल्याने तुरुंगात गेलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी ओ. पन्नीरसेल्वम यांनी सोमवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शपथविधीच्या सोहळ्यादरम्यान राज्यपाल के. रोशय्या यांच्याकडून शपथ घेताना भावूक झालेल्या ओ.पन्नीरसेल्वम यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी राज्यपालांकडून नवीन मंत्रिमंडळालादेखील शपथ देण्यात आली. दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांकडे विचारणा सुरू होती. मात्र, अधिकारी याबद्दलची माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते.
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने शनिवारी जयललिता यांना दोषी ठरवल्यानंतर न्यायालयातच जयललिता यांनी पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची सूचना केली होती. त्यानुसार तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत रविवारी पन्नीरसेल्वम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यानंतर पन्नीरसेल्वम यांनी राज्यपाल रोशय्या यांची भेट घेऊन हा निर्णय त्यांना कळवला. २००१ साली सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांचे मुख्यमंत्रिपद रद्द ठरवल्यानंतरही पन्नीरसेल्वम यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले होते.