अल-कायदाशी संगनमत करून अमेरिकेविरोधात कटकारस्थाने रचणाऱ्या अमेरिकी नागरिकांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांची माहिती आता ओबामा प्रशासन मंत्रिमंडळात उघड करणार आहे. तसेच यासंदर्भातील माहिती अमेरिकी संसदेतही खुली करणार आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनीच याविषयीचे संकेत दिले आहेत.
दहशतवादविरोधी लढाईत अमेरिकेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच अमेरिकी नागरिकांची सुरक्षा अभेद्य ठेवण्यासाठी आखलेल्या कायद्याच्या चौकटीला अधिक बळकटी यावी यासाठी ओबामा प्रशासनाने ही गोपनीय माहिती उघड करण्याचे ठरवले आहे. गेल्या वर्षी येमेनमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकी नागरिकही ठार झाले होते. त्यावरून बराच गदारोळ माजला होता. मात्र, ठार झालेले सर्वच अल-कायदाशी संगनमत राखून होते असे आढळून आले. त्याची दखल घेतच ओबामा प्रशासनाने आपल्या कृतीला कायद्याचे अधिष्ठान देण्यासाठी ड्रोन हल्ल्यात मृत झालेल्या अमेरिकी नागरिकांची गोपनीय माहिती उघड करण्याचे ठरवले आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी यांनीही बुधवारी ओबामा प्रशासनाने यासंदर्भातील हालचाली सुरू केल्याचे स्पष्ट केले होते. तसेच याबाबतीतील गोपनीय माहिती उघड करण्याची मागणीही गेले काही महिने सातत्याने होत होती. या सर्व पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.