पॅरिस हवामान करार घडणार की बिघडणार याची अंतिम घटिका समीप आली असताना भारताने या कराराला संमती द्यावी यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला होता. दोन्ही नेत्यांनी सक्षम असा हवामान करार होण्यासाठी वचनबद्ध असल्याचे या वेळी स्पष्ट केल्याचे समजते.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी हवामान बदल परिषदेत भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी केलेली चर्चा सकारात्मक ठरली असतानाही ओबामा यांनी मोदींना दूरध्वनी केला. भारत महत्त्वाकांक्षी व न्याय्य हवामान करारासाठी आग्रही आहे, असे त्या वेळी सांगण्यात आले. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (सीओपी २१) परिषद पॅरिसमध्ये सुरू असून ती शुक्रवारी संपणार आहे. हवामान करारासाठीचा अवधी आता कमी होत चालला आहे.