अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची बहुचर्चित आग्रा भेट रद्द करण्यात आली आहे. तेथे ते जगातील सातवे आश्चर्य असलेला ताजमहाल पाहण्यासाठी पत्नी मिशेल ओबामा यांच्यासमवेत ते जाणार होते. त्यांची आग्रा भेट सुरक्षा कारणास्तव रद्द करण्यात आली, की त्यांना सौदी अरेबियाला जायचे असल्याने रद्द करण्यात आली याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. ताजमहाल जवळ मोटार नेण्यास परवानगी नाही हे एक कारणही त्यांनी ही भेट रद्द करण्यामागे सांगितले जात आहे.
ओबामा यांनी २७ जानेवारी रोजी निवडक लोकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम कायम ठेवला आहे. २७ जानेवारीला ते सौदी अरेबियाला रवाना होणार आहेत. अमेरिकी अधिकाऱ्यांना ओबामा यांच्या दौऱ्यातील या बदलाची माहिती देण्यात आली आहे. ओबामा यांची भेट सुरक्षाकारणास्तव रद्द करण्यात आली असावी असा अंदाज असला तरी कारण मात्र सौदी अरेबियाला तातडीने जावे लागणार असल्याचे देण्यात आले आहे.
ओबामांचा कार्यक्रम
बराक ओबामा यांचा दौरा तीन दिवसांचा असून ओबामा यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा, तसेच त्यांचे अधिकारी यांचे रविवारी सकाळी १० वाजता नवी दिल्ली येथे आगमन होईल, असे व्हाइट हाऊसने सांगितले.   दुपारी १२ वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत करतील, नंतर ते १२.४० वाजता महात्मा गांधी यांच्या राजघाट येथील समाधीला भेट देऊन वृक्षारोपण करतील. हैदराबाद हाऊस येथे ते दुपारचे भोजन घेतील व नंतर २.४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील; नंतर दोन्ही देशांची शिष्टमंडळे भेटतील, ओबामा हे दूतावास अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयटीसी मौर्य हॉटेल येथे रात्री ७.३५ वाजता भेटतील. नंतर ते राष्ट्रपती भवनात जातील. तेथे ७.५० वाजता शाही भोजन आयोजित केले आहे. २६ जानेवारीला ते प्रजासत्ताक दिन संचलनास प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या पत्नीसह उपस्थित राहतील.