अफगाणिस्तानातील युद्ध खर्च आणि जगभरातील अमेरिकी नागरिकांच्या वाढीव सुरक्षेसाठी सुमारे ६३३ अब्ज अमेरिकी डॉलर्सची तरतूद असलेल्या संरक्षण विधेयकास अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंजुरी दिली. संबंधित विधेयकाच्या मसुद्यावर त्यांनी स्वाक्षरी केली.  अमेरिकेचे लष्कर हे जगातील सर्वात बलवान लष्कर असावे, या हेतूने आपण हे करीत आहोत, असे ओबामा यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे. या विधेयकावर ओबामा यांनी स्वाक्षरी केल्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण खात्यास २०१३ या वर्षांत ६३३ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा विनियोग करण्याची मुभा मिळेल. ‘नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन अ‍ॅक्ट-२०१३’च्या काही तरतुदींबद्दल आपल्या मनात काही शंका आहेत. तरीही आपण हे विधेयक मंजूर करीत असल्याचे ओबामा यांनी स्पष्ट केले. या विधेयकासंबंधी नकाराधिकार वापरण्याचा इशाराही ‘व्हाइट हाऊस’ ने दिला होता.