अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला प्रजासत्ताकदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून दोन्ही देश लोकांच्या आशाआकांक्षा तसेच जागतिक भागीदारीसाठी खऱ्या अर्थाने काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारताच्या ६५ व्या प्रजासत्ताकदिना निमित्त शुभेच्छा देताना ओबामा यांनी सांगितले की, ‘भारताच्या लोकशाही वारशाच्या या महोत्सवात अमेरिकेची जनताही भारतीय लोकांच्या समवेत आहे. दोन्ही देशांमधील  सहकार्य हे मूल्ये व परस्पर हितांवर आधारित असून यापुढेही भारताबरोबर काम करण्याची आमची तयारी आहे. मैत्री व सहकार्याच्या या भावनेतून अमेरिकी लोकांच्या वतीने आपण भारताला प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देत आहोत’, असे ओबामा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. भारताची भरभराट होतानाच तेथे शांतता नांदावी अशीच आमची आशा आहे असे त्यांनी या संदेशात म्हटल्याचे राष्ट्रपती मुखर्जी यांचे प्रसिद्धी सचिव वेणू राजमणी यांनी सांगितले. भारतीय प्रजासत्ताकदिन हा लोकशाही संस्था व परंपरांचे स्मरण करून देतो असे त्यांनी भारतातर्फे आयोजित स्वागत समारंभात सांगितले.
दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी व सलमान खुर्शीद यांची स्वित्र्झलडमध्ये सीरिया प्रश्नावर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बैठकीच्या निमित्ताने भेट झाली.