धर्म हे संघर्षांचे कारण बनू नये, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केल्यापाठोपाठ आपल्या भारत दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही, ‘धार्मिक आधारावर विभाजित होत नाही तोपर्यंत भारत प्रगती करीत राहील’, असे मत व्यक्त केल्याने आणि राज्यघटनेने दिलेला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा भारत आणि अमेरिकेतला समान दुवा असून धार्मिक स्वातंत्र्याची ही मूलभूत जबाबदारी सरकारनेही कसोशीने पाळली पाहिजे, असे स्पष्ट नमूद केल्याने विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर नेम धरला आहे. मित्राचा हा सल्ला ऐकून मोदींनी आता ‘घरवापसी’त रमलेल्यांना आवरावे, असा टोला काँग्रेसने हाणला आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या भूमिकेची री ओढणाऱ्या समाजमाध्यमवीरांनी ओबामांच्या या सल्ल्यावर झोड उठवली आहे. ओबामांना जाता जाता प्रवचन द्यायची काही गरज नव्हती, अशी टीका समाजमाध्यमांत उमटत आहे. भाजपने मात्र या वक्तव्याचा भाजप सरकारशी संबंध जोडणे गैर आहे, असे नमूद केले आहे.
सिरी फोर्ट सभागृहात कार्यक्रमात  ओबामा म्हणाले की, भारत आणि अमेरिकेने लोकशाही, धार्मिक स्वातंत्र्य ही मूल्ये जपली आहेत. जगात धर्माच्या नावाखाली दहशतवाद पसरवला जातो. आपल्याला फोडण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर सावध राहिले पाहिजे.
विविध धर्म ही एकाच बागेतील सुंदर फुले व एकाच वृक्षाच्या फांद्याही आहेत असे महात्मा गांधींनी म्हटले होते, याचाही उल्लेख ओबामा यांनी केला. धार्मिक स्वातंत्र्य अमेरिकेच्या राज्यघटनेने दिलेले आहे. धर्माच्या अनुसरणाचा व प्रसाराचा हा अधिकार पाळला पाहिजे, असे ते म्हणाले.