नाझीवादाच्या जोखडातून युरोपला मुक्त करण्यासाठी बरोबर ७० वर्षांपूर्वी फ्रान्सने आजच्या दिवशी (६ जून १९४४) निर्णायक आघाडी उघडून युद्धास तोंड फोडले आणि अवघ्या २४ तासांत दुसऱ्या जागतिक युद्धाची इतिश्री झाली. त्यावेळी नाझीवादाचे उच्चाटन करण्याची जबाबदारी जगभरातील विविध नेते, राष्ट्रप्रमुख हजारो सैनिक, लष्करी अधिकारी आदींनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. त्यांच्यापैकी आता नव्वदीच्याही पुढे असावेत. या पाश्र्वभूमीवर हाच दिवस ‘डीडे’ म्हणून ओळखला जातो. तो साजरा करण्यासाठी जगभरातील मान्यवर नेते शुक्रवारी फ्रान्समध्ये जमले खरे. परंतु या सोहळ्यावर युक्रेनच्या समस्येची गडद सावली पडली होती.
यासाठी फ्रान्सच्या उत्तरेकडील विविध किनाऱ्यांवर सोहळ्यांना शुक्रवारी प्रारंभ झाला. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सिस्को हॉलण्डे यांनी या सोहळ्याचे उद्घाटन केले. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ या ८८ वर्षांच्या असून त्यांच्यासह जगभरातील अनेक मान्यवर हा सोहळा साजरा करण्यासाठी येथे जमले आहेत. याखेरीज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हेही येथे आले आहेत. या कार्यक्रमासाठी ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आदी देशांमधून सुमारे १,८०० ज्येष्ठ नागरिक आले आहेत. ‘डीडे’ दरम्यान ज्या हजारो कॉम्रेडनी आपले प्राणार्पण केले, त्यांच्याप्रती रशिया आणि पोलंडही आदर व्यक्त करतील.
 मात्र, युक्रेनच्या पेचप्रसंगाची या सोहळ्यावर सावली पडली असून त्याच मुद्दय़ावरून पूर्व व पाश्चिमात्यांमध्ये गुरुवारी काही प्रमाणात सुरू झालेल्या शीतयुद्धाचे ढग शुक्रवारीही या सोहळ्यावर जमले होते.  
युक्रेनच्या मुद्दय़ावरून बहुतेक सर्व राष्ट्रप्रमुखांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कानपिचक्या दिल्या असून रशियाने युक्रेनला पाठिंबा द्यावा, सध्या तेथे असलेली परिस्थिती आम्हाला मंजूर नसून त्यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे, असे मत बहुतेकांनी मांडले आहे.
पुतिन यांच्यासमोर पेच
युक्रेनमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पाश्चिमात्य मित्रराष्ट्रांनी रशियासमोर नवा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, त्यांनी त्या प्रस्तावाचा योग्य विचार न केल्यास रशियाला नव्या नियंत्रणांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा देण्यात आल्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
युक्रेनच्या नव्या सरकारला मान्यता देऊन रशियाचे अध्यक्ष कडक कारवाई टाळू शकतात. याखेरीज रशियाच्या पाठबळाने तेथील पूर्वेकडील शहरांमध्ये सुरू असलेल्या बंडखोरीसही त्यांनी आळा घालणे आवश्यक आहे, असे ओबामा व अन्य नेत्यांनी स्पष्ट केले आहे.