जगभरातील नेत्यांचा रशियाच्या प्रस्तावास वाढता पाठिंबा
आपल्याकडील शस्त्रसाठा आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली ठेवण्याची सीरियाची तयारी असेल तर संभाव्य लष्करी कारवाई थांबविण्याची आपली तयारी आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले. याच मुद्यास जगभरातील नेत्यांचाही पाठिंबा मिळत असून रशियासुद्धा या प्रश्नावर आणखी कोणता व्यवहार्य तोडगा काढता येतो का यासाठी सक्रिय झाली आहे.
बशर अल असद यांच्या नेतृत्वाखालील सीरियाने आपल्याकडील सर्व रासायनिक शस्त्रास्त्रे आंतरराष्ट्रीय समुदायाकडे नियंत्रणासाठी द्यावीत, असे रशियाने सुचविले होते. तसेच संभाव्य युद्ध टाळण्यासाठी सीरियासह या अंगाने चर्चाही सुरू करण्यात आली.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी गरजेचे असेल असे प्रत्येक पाऊल उचलायला आम्ही मागे पहाणार नाही. मात्र जर सीरियाची या प्रस्तावास मान्यता असेल तर आम्ही लष्करी कारवाई थांबवू, असे ओबामा यांनी स्पष्ट केले.
गरज फक्त तातडीची
लष्करी कारवाई हा आमच्यासमोरीलसुद्धा अंतिम पर्यायच होता. जर तो न वापरताही सीरियाकडील शस्त्रास्त्रांचा धोका टळणार असेल, तर आपली काहीच हरकत नाही असे अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. मात्र यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. सीरिया प्रश्नावर अमेरिकी काँग्रेसचा पाठिंबा मिळेल का, याबाबत मात्र आपण संभ्रमात असल्याचे ओबामा यांनी
सांगितले. माध्यमांच्या माहितीनुसार ओबामा यांना सिनेटच्या मान्यतेसाठी ५० मते कमी पडतील असा अंदाज आहे.

तर सीरियावर हल्ला करणार नाही – ओबामा
वॉशिंग्टन: सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या राजवटीने त्यांच्या देशातील रासायनिक अस्त्रांचा साठा आंतरराष्ट्रीय नियंत्रकांच्या निगराणीखाली ठेवण्याचे मान्य केले, तर सीरियावर हल्ल्याची योजना रद्द केली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. सीरियावरील कारवाईला काँग्रेसकडून पुरेसा पाठिंबा मिळण्याची शक्यता वाटत नसल्याने ओबामा यांनी आता हा नवीन पवित्रा घेतला आहे. सीरियाने त्यांचा रासायनिक शस्त्रसाठा व ती तयार करणाऱ्या यंत्रणा आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली आणाव्यात यासाठी रशियाने मांडलेल्या प्रस्तावाच्या फलनिष्पत्तीविषयी आपल्याला शंका आहे परंतु तरीही आपण त्याकडे गांभीर्याने पाहतो, असे ओबामा यांनी सांगितले.रशियाचा हा प्रस्ताव ही सकारात्मक घडामोड असल्याचे सांगून ते म्हणाले, की सीरियाच्या अध्यक्षांनी रासायनिक अस्त्रे आंतरराष्ट्रीय निगराणीखाली ठेवण्यास मान्यता दिली, तर अमेरिका हल्ल्याची कारवाई करणार नाही, पण जर प्रत्यक्ष सीरियाने तसे खरोखर केले तरच कारवाई टळेल.जर लष्करी कारवाईशिवाय त्यांनी रासायनिक अस्त्रे निगराणीखाली आणण्याचे मान्य केले, तर आपण त्या तोडग्याला अग्रक्रम देऊ.

सीरियात मतभेद
रशियाने रासायनिक शस्त्रांस्त्रांबाबत मांडलेल्या प्रस्तावाला सीरिया सरकार अनुकूल असल्याची चिन्हे आहेत. सीरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. जर या निर्णयामुळे लष्करी कारवाई टळत असेल, युद्ध होणार नसेल तर आमची या प्रस्तावाकडे सकारात्मकतेने पाहण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सीरियातील विरोधी पक्षाने रशियाच्या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे सीरियातच या प्रस्तावाबाबत मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे.

रशियाचे प्रयत्न
सीरियावरील लष्करी कारवाई टाळण्यासाठी अमलात आणण्यायोग्य, व्यावहारिक, सर्वमान्य आणि नेमक्या पर्यायासाठी रशिया सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जी लावरॉव्ह यांनी दिली. रशियाच्या प्रयत्नांचे तसेच प्रस्तावाचे ओबामा यांनी स्वागत केले आहे. हा पर्याय म्हणजे या कोंडीतून निघू शकणारा सर्वात आशादायी मार्ग असल्याचे ओबामा यांनी नमूद केले आहे.

सरकारकडूनही  प्रस्तावाचे स्वागत
आमच्यावरील हल्ला रोखण्यासाठी रशियाने केलेले प्रयत्न स्तुत्य असल्याचे सीरियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वालिद अल मौलेम यांनी स्पष्ट केले. मात्र शस्त्रास्त्र नियंत्रण आंतरराष्ट्रीय समुदायाकडे सोपविण्याच्या मुद्यावर कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.