अमेरिकेने दुसरे महायुद्ध संपुष्टात आणण्यासाठी हिरोशिमात केलेल्या अणुहल्ल्याबाबत माफी मागणार नाही, असे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ते जपानमधील हिरोशिमा शहराला ऐतिहासिक भेट देत असून त्यांनी माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.जपानच्या एनएचके या सार्वजनिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, युद्धाच्या काळात नेते सर्व प्रकारचे निर्णय घेत असतात हे मान्य करणे यात महत्त्वाचे आहे. प्रश्न विचारणे, त्यांची तपासणी करणे हे इतिहासकारांचे काम आहे. युद्धाच्याकाळात अनेक अवघड निर्णय घ्यावे लागत असतात हे मान्य करणे आवश्यक आहे. हिरोशिमातील अणुहल्ल्याच्या ठिकाणी भेट देणारे ओबामा हे पहिले विद्यमान अध्यक्ष असतील. हिरोशिमात ६ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला होता, त्यात १ लाख ४० हजार लोक मरण पावले होते. अनेक लोक अणुबॉम्ब पडल्यानंतरच्या अग्नीच्या लोळात सापडून जागीच ठार झाले, तर काही जण जखमी अवस्थेत अनेक आजार होऊन मरण पावले होते. नागासाकी येथे तीन दिवसांनी अणुबॉम्ब टाकण्यात आला होता, त्यात ७४ हजार लोक मारले गेले होते. दुसऱ्या महायुद्धातील ती शेवटची कृती होती.