अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हिएतनामसमवेतच्या नागरी अणुकराराला मान्यता दिली आहे. त्यामुळे वीजटंचाईने ग्रस्त असलेल्या व्हिएतनामला अणुभट्टीची विक्री करणे शक्य होणार आहे.
ओबामा यांनी या कराराला मान्यता दिल्याने या बाबत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या फेरआढावा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर करार रद्द करण्याबाबत कोणताही कायदा संमत झाला नाही, तर त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
या करारानुसार, व्हिएतनाम आण्विक शस्त्रास्त्रांसाठी किरणोत्सर्गी घटकांचे उत्पादन करणार नाही आणि अमेरिकेच्या अणुकरार र्निबधांचे पालन करण्याबाबत बांधील राहणार आहे. या करारामुळे संरक्षण आणि सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही, तर त्यांचे पालनच होईल, असा विश्वास ओबामा यांनी व्यक्त केला आहे.
आण्विक शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या युरेनियमचा वापर न करण्याचे व्हिएतनामने मान्य केले असून, त्याबाबत ऑक्टोबर महिन्यात ब्रुनेईत होणाऱ्या पूर्व-आशिया शिखर परिषदेत स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.
यासाठी लागणाऱ्या इंधनाबाबतचे घटक खुल्या आंतरराष्ट्रीय बाजारातून उपलब्ध करून घेण्याचेही मान्य करण्यात आले आहे. व्हिएतनाममध्ये सध्या विजेची टंचाई असून ते अणुऊर्जेचा पाठपुरावा करीत आहेत. पहिला अणुऊर्जा प्रकल्प २०२० मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.