अमेरिकेवर २००८ सालानंतर आलेल्या मंदीच्या तडाख्यामुळे विविध क्षेत्रांवर निर्माण झालेली ‘अर्थ’घसरण आणि कपातीच्या धोरणे यांचे पर्व थांबण्याची चिन्हे नाहीत. या अवघड अर्थपरिस्थितीला  सावरण्यासाठी ‘बोलाची कढी’ न दाखवता आपल्या पगारातील ५ टक्के रक्कम तिजोरीमध्ये जमा करण्याचे जाहीर करून ओबामा यांनी वेगळा आदर्श दाखवून दिला आहे. यानुसार ओबामा यांच्या पगारामधील २० हजार डॉलर (१० लाख रुपये) सरकारी तिजोरीमध्ये जमा होणार आहेत.

हे कसे घडणार?
ओबामा यांचा वार्षिक पगार ४ लाख डॉलर (२ कोटी रुपये) इतका आहे. यातील पाच टक्के रक्कम ही सरकारी तिजोरीत जमा होणार आहे. सध्याच्या सरकारी खर्चातील कपातीच्या वाढत गेलेल्या परिस्थितीमध्ये ओबामांना हे करायचे असल्याचे त्यांनी प्रशासनामधील सर्वाना सांगितल्याचे व्हाइट हाउसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षाचे वेतन हे कायदा व काँग्रेस सदस्य यांनी ठरवून दिलेले असते, त्यात बदल केला जाऊ शकत नाही. मात्र अध्यक्ष सरकारी सेवक म्हणून कपातीच्या काळामध्ये त्यातील काही भाग तिजोरीमध्ये देऊ शकतो, असे कार्नी यांनी स्पष्ट केले. ओबामा दर महिन्याला धनादेशाद्वारे ही रक्कम तिजोरीमध्ये जमा करतील. ओबामांनी वेतन टक्का सोडण्याच्या घोषणेआधीच आदल्या दिवशी संरक्षणमंत्री चक हेगेल यांनीही याच पद्धतीने आपल्या पगारामधील रक्कम तिजोरीमध्ये जमा केली आहे. सिनेटर मार्क बेगीच यांनीदेखील आपल्या पगारातील काही रकमेवर उदक सोडले आहे.