अमेरिकेतील न्यायालयाचा निकाल

ओबामाकेअर योजना घटनाबाह्य़ असल्याचा निकाल संघराज्य न्यायाधीशांनी दिला असून त्यामुळे ट्रम्प प्रशासनाचा मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे. टेक्सासच्या संघराज्य न्यायाधीशांनी संपूर्ण अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट रद्दबातल ठरवला असून हा कायदा म्हणजेच ओबामाकेअर योजना होय. व्यक्तिगत पातळीवर आरोग्य सुरक्षेसाठी ओबामा प्रशासनाने ही योजना आणली होती.

रिपब्लिकन पक्षाचे काही गव्हर्नर व राज्यांचे महाधिवक्ते यांच्या गटाने ओबामाके अरविरोधात याचिका दाखल केली होती.  अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट नुसार संघराज्य विमा योजनेसाठी स्वाक्षरी करण्यासाठी शनिवारी अमेरिकी लोकांना अखेरची मुदत देण्यात आली होती.

या निकालावर आव्हान याचिका दाखल केली जाणार असून डेमोक्रॅट पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. जिल्हा न्यायाधीश रीड ओ कोनोर यांनी निकालात म्हटले आहे की, करदात्यांच्या पैशातून अशा प्रकारची योजना राबवता येणार नाही. किंबहुना तशी योजना राबवणे घटनाबाह्य़ आहे. ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ओबामाकेअर योजना घटनाबाह्य़ असल्याचा निकाल टेक्सासच्या सन्माननीय न्यायाधीशांनी दिला आहे ही अमेरिकेसाठी मोठी सुवार्ता आहे.

ओबामाकेअर योजना रद्द करण्याचा मुद्दा ट्रम्प यांनी प्रचारात मांडला होता. ओबामाकेअर योजना न्यायालयाकडून घटनाबाह्य़ ठरवली जाईल असे आपण म्हटले होते व तसेच आता झाले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने ओबामाकेअरचा अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट हा २०१२ व २०१५ मध्ये घटनात्मक पातळीवर योग्य ठरवला होता. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने आताच्या निकालास विरोध केला असून रिपब्लिकन पक्षाने लोकांवर केलेला हा हल्लाच आहे लोकांना आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे असे डेमोक्रॅटिक नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी सांगितले.