अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बंदुकींच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचविलेले उपाय आपल्याला मान्य नाहीत, मात्र बंदुकीचा हिंसाचार रोखण्यासाठी पावले उचलताना ओबामा यांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू खरे आहेत, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे बराक ओबामा यांच्यावर सातत्याने टीका करणारे म्हणून ओळखले जातात. ओबामा यांच्या बंदूक नियंत्रण उपाययोजना आपल्याला अमान्य आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र त्यांच्या हृदयात ज्या भावना आहेत त्या खऱ्या आहेत, असेही ट्रम्प म्हणाले. बंदुकीद्वारे होणाऱ्या हिंसाचाराबाबत ओबामा यांनी मंगळवारी जे भाषण केले त्याबाबत ट्रम्प यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कनेक्टिकट येथे २०१२ मध्ये लहान मुलांचे हत्याकांड घडले त्याबाबत भाष्य करताना ओबामांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते अश्रू पुसताना ओबामा यांनी बंदुकींच्या वापराबाबत आखण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ओबामा यांच्या प्रयत्नांमागील संकल्पना चुकीची आहे, मात्र ओबामा यांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू खरे होते, असे ते म्हणाले. या वेळी ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावरही टीका केली. हिलरी या ओबामा यांच्यापेक्षा वाईट आहेत. त्यांना प्रत्येकाकडून बंदूक काढून घ्यावयाची आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या संरक्षणासाठी ओबामांनी कारवाई केली पाहिजे, मात्र ती कायद्याद्वारे करावी, असेही ट्रम्प यांनी नमूद केले.