रेल्वेत प्रवाशांना ‘मसाज’ सेवा देण्याच्या रेल्वेच्या प्रशासनाच्या योजनेवर माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त करीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, त्यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना एक पत्र लिहून या सेवेवर आक्षेप घेतला आहे. महिला प्रवशांसमोर अशा प्रकारे मसाज करणे हे चुकीचे असून ते भारतीय संस्कृतीच्याविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाजन यांच्यापूर्वी इंदूरचे भाजपाचे खासदार शंकर लालवानी यांनी देखील या सेवेला पातळीहीन सेवा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता या सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वे प्रशानसनाकडून काही दिवसांपूर्वीच इंदूरहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या ३९ एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता.

महाजन यांनी पत्रात म्हटले की, महिला प्रवाशांच्यासमोर धावत्या ट्रेनमध्ये अशी सुविधा उपलब्ध करुन देणे कितपत योग्य आहे. लालवानी यांनीही म्हटले होते की, प्रवासादरम्यान प्रवाशांना आवश्यक आरोग्य सुविधा आणि डॉक्टर्स उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्याऐवजी मसाजसारखी पातळीहीन सुविधा देण्याला काही अर्थ नाही. काही स्थानिक महिला संघटना आणि सामाजिक संस्थांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे. मसाज सेवा पर्यटनस्थळी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये ऑफर केली जाऊ शकते. मात्र, सामान्य प्रवाशी गाड्यांमध्ये ही सुविधा देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने फेरविचार करायला हवा, असे लोकांचे म्हणणे असल्याचे लालवानी यांनी म्हटले होते.

दरम्यान, ही सुविधा सुरु करण्यापूर्वी आम्ही याबाबतच्या सर्व बाबींचा विचार करणार आहोत. यामुळे कोणालाही असुविधेला सामोरे जावे लागणार नाही आणि प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही याचाही विचार केला जाणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या सुविधेसाठी प्रवाशांना १०० रुपयांपासून ३०० रुपयांचपर्यंत खर्च येऊ शकतो. कारण, मसाजसाठी रेल्वेने गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम ही तीन पॅकेजेस दिली आहेत. गोल्ड सेवेत १५ ते २० मिनिटांसाठी जैतून तेलाने (कमी तेलकट) मसाज केला जाईल. तर डायमंड आणि प्लॅटिनम सेवेत तेलासोबत क्रीम लावून मसाज केला जाणार आहे. मालवा एक्स्प्रेस, नवी दिल्ली इंटरसिटी एक्स्प्रेस, अहिल्यानगरी एक्स्प्रेस, अवांतिका एक्स्प्रेस, क्षिप्रा एक्स्प्रेस, नर्मदा एक्स्प्रेस, पेंचवली एक्स्प्रेस आणि उज्जयनी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. या सेवेतून रेल्वेला सुमारे २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.