जुलै महिन्यात एका महिलेशी गैरवर्तन करून तिची छळवणूक करणारे अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबैय्या षण्मुगम यांची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) मदुराईतील थोप्पूर येथील प्रकल्पाच्या समिती सदस्यपदी निवड केल्याने विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदविला आहे.

डॉ. षण्मुगम यांनी जुलैत त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका ६२ वर्षांच्या महिलेला त्रास देताना तिच्या घरासमोर मूत्रविसर्जन करून शस्त्रक्रियेतील मुखपट्टय़ा त्यांच्या दारात टाकल्या होत्या. महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीस ही नवीन नियुक्ती देऊन या वर्तनाचा सन्मानच करण्यात आला आहे, अशी टीका अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ट्विटरवर केली आहे. जुलैतील त्या घटनेबाबत सुबैय्या यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता, असे या महिलेचे पुतणे बालाजी विजयराघवन यांनी म्हटले आहे. ११ जुलैला सदर महिलेने सीसीटीव्ही चित्रणासाह पोलिसात तक्रार दिली होती, सुबैय्या यांनी त्या आरोपांचा इन्कार करुन चित्रफीत बनावट असल्याचे म्हटले होते.

विरोधकांकडून संताप..

या नेमणुकीने वैद्यकीय व्यवसायचाच अपमान झाला असून महिलांच्या छळवणुकीस पाठबळ मिळाले आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार जोथीमणी यांनी केली. काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे  षण्मुगम यांना समितीतून काढण्याची मागणी केली आहे. व्हीसीके (विदुथलाई चिरूथगल काटची) नेते डी. रवीकुमार यांनी हा महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे; तर माकप खासदार व्यंकटेशन यांनी समितीवरील नेमणूक म्हणजे षण्मुगम यांनी महिलेशी केलेल्या गैरवर्तनाला बक्षिसी मिळाल्यासारखेच असल्याचे म्हटले आहे.