गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या मोबाईल क्रमांकावरुन व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी गोव्यातील राजकीय वर्तुळामध्ये याच प्रकरणाची चर्चा रंगल्याचे चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणामध्ये आता सत्ताधारी भाजपाचा माजी सहकारी असणाऱ्या गोवा फॉरवर्ड फ्रण्ट (जीएफपी) पक्षाने तक्रार दाखल केली आहे. उपमुख्यमंत्र्यांविरोधात लैंगिक अत्याचार आणि महिलांच्या सन्मानाला हानी पोहचवण्याच्या कलमाअंतर्गत तक्रार दाखल केल्याचे द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

मात्र कवळेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हा मेसेज ज्या वेळी ग्रुपवर पोस्ट करण्यात आला तेव्हा आपण झोपलो होतो आणि फोनच्या आसपासही नव्हतो असा दावा केला आहे. कवळेकर यांनीही गोवा पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून यामध्ये त्यांनी आपला मोबाईल हॅक करुन त्या माध्यमातून अश्लील गोष्टी समाज माध्यमांमध्ये शेअर करण्यात आल्याचे म्हटले आहे.

“मी व्हॉट्सअपवर ज्या ग्रुपमध्ये सदस्य आहे त्यापैकी केवळ एका ठराविक ग्रुपमध्येच हा मेसेज पाठवण्यात आला आहे,” असं कवळेकर यांनी म्हटलं आहे. यावरुन मुद्दाम कोणीतरी माझ्या नावाने हा मेसेज पाठवून मला यामध्ये अडकवू पाहत असल्याचा आरोप कवळेकर यांनी केला आहे. व्हिलेजेस ऑफ गोवा या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडीओ पाठवण्यात आला आहे. जीएफपीच्या महिला विभागाने हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या ग्रुपमध्ये हा अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आला त्या ग्रुपमध्ये अनेक महिला कार्यकर्त्या आणि सरकारी अधिकारी असल्याने हे प्रकरण लैंगिक अत्याचाराअंतर्गत येत असल्याचेही जीएफपीच्या महिला विभागाने म्हटलं आहे. डिजीटल माध्यमातून महिलांबद्दलचा आक्षेपार्ह कंटेट शेअर केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांविरोधात माहिती आणि तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६७ आणि ६७ अ आणि कलम ३५४ अ नुसार गुन्हा नोंदवावा अशी मागणी जीएफपीने केली आहे.

“राज्यात अशाप्रकारचे लोक नेते असू नयेत. अशा प्रकरणांबद्दल मौन धारण करुन भाजपाच्या महिला नेत्या अशा लोकांना राज्यात सत्तेत राहण्यासाठी पाठिंबा देताना दिसत आहेत,” अशी टीका जीएफपीच्या गोव्यातील महिला सरचिटणीस क्लारा रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

यापूर्वीही आपल्याला बदनाम करण्यासाठी अशाप्रकारचे अनेक प्रयत्न झाल्याचा दावा कवळेकर यांनी केला आहे. लोकांसमोर आपली चुकीची प्रतिमा तयार व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही कवळेकर म्हणाले आहेत. “माझ्या मोबाईल फोनबरोबर छेडछाड करुन अश्लील माहितीचा प्रसार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,” असं कवळेकर यांनी म्हटलं आहे. जीएफपीने या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केलीय.