काँग्रेस नेता प्रियंका गांधींबाबत अश्लिल टिप्पणी करणाऱ्या एका व्यक्तीला बिहार पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधींच्या छायाचित्राशी छेडछाड करुन ट्विटरवर पोस्ट करुन त्यासोबत अश्लिल टिप्पणी केल्याप्रकरणी त्याच्यावर अटक करण्यात आली आहे. योगी सुरजनाथ असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

30 जानेवारी रोजी सुरजनाथ याच्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते शाहीन सैय्यद यांनी ही तक्रार केली होती. अटक करण्यात आलेला व्यक्ती सोशल मीडियावर स्वतःला मोदी भक्त असल्याचं सांगतो. मात्र, भाजपाने या व्यक्तीशी आपला कोणाताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. बिनोदपूर परिसरातील रहिवासी असलेल्या सुरजनाथ याला कटिहार येथून अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. प्रियंका सक्रीय राजकारणात उतरणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी यांनी पक्षाच्या सरचिटणीसांसह राज्यांमधील प्रभारींची ७ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित केली आहे. सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी या बैठकीत सहभागी होतील. सरचिटणीसांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांबरोबर ९ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावली आहे. यात प्रदेश काँग्रेसच्या तयारीबाबत चर्चा होईल.

यापूर्वी राहुल गांधी हे बहीण प्रियंका यांच्यासह प्रयागराज येथे सुरू असलेल्या अर्धकुंभ मेळ्यात सहभागी होणार असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील कुंभ क्षेत्रात प्रियंका यांना गंगाची मुलगी म्हणणारे पोस्टर्स लावण्यात आले होते.