दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या आमदार आणि खासदारांना बँक खात्यांचे तपशील सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ८ नोव्हेंबरनंतरचे बँक तपशील सादर करण्याचे आदेश पंतप्रधानांनी भाजपच्या आमदार, खासदारांना दिले आहेत. यावर अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘पंतप्रधान मोदींनी भाजपच्या लोकप्रतिनिधींना ८ नोव्हेंबरनंतरचेच बँक तपशील देण्याची सूचना का केली ?,’ असा सवाल केजरीवाल यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या. या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या दरम्यान बँकांमध्ये केलेल्या सर्व व्यवहारांचा तपशील सादर करण्याचे आदेश भाजपच्या आमदार, खासदारांना देण्यात आले आहेत. हे सर्व तपशील भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे देण्यात यावेत, अशी सूचना मोदींनी दिली आहे. यावर ‘फक्त ८ नोव्हेंबरपासूनचे तपशील का मागितले आहेत ? त्यापेक्षा मागील सहा महिन्यांचे तपशील मागवा,’ असे ट्विट केजरीवालांनी केले आहे.

‘पंतप्रधानांनी भाजपच्या आमदार, खासदारांच्या बँक खात्याचा मागील सहा महिन्यांचा तपशील मागवायला हवा. याशिवाय पंतप्रधान मोदींनी अदानी, अंबानी, पेटीएम आणि बिग बझारच्या ८ नोव्हेंबरच्या सहा महिन्यांपूर्वीचा तपशीलदेखील मागवायला हवा,’ असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला केजरीवालांनी घोटाळा म्हटले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा केजरीवालांनी निषेध केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काढलेल्या मोर्चातही केजरीवाल यांनी सहभाग घेतला होता.

नोटाबंदीच्या निर्णयावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टिकेची झोड उठवली आहे. विरोधकांनी संसदेत आणि संसदेबाहेर नोटाबंदीचा विरोध केला आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होऊ शकलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीवरील चर्चेत सहभागी व्हावे, अशी विरोधकांची मागणी आहे.