भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून या वादळात तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये एकूण ९ जणांना जीव गमवावा लागला आहे. पुढील २४ तासांत ओखी चक्रीवादळ लक्षद्वीपच्या दिशेने सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप बेटावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

ओखी हे चक्रीवादळ गुरुवारी केरळमधील दक्षिण किनारपट्टीजवळ पोहोचले होते. बुधवारी निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गुरुवारी अधिकच तीव्र झाला आणि तो चक्रीवादळात रुपांतरित झाला, असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले. बांगलादेशने या वादळाला ओखी असे नाव दिले आहे. शुक्रवारी देखील केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये ओखी चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह वादळी वारे वाहत आहेत. या वादळामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. सर्वाधिक मृत्यू हे केरळमध्ये झाल्याचे समजते. वादळाचा जोर ओसरल्यानंतर बचावकार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश एनडीआरएफ तसेच अन्य आपातकालीन यंत्रणांना देण्यात आले आहेत. शुक्रवारी ओखी चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

कोच्ची आणि लक्षद्वीप बेटासाठी नौदलाच्या दोन नौका तैनात करण्यात आल्या आहेत. वादळ आणि पावसामुळे तामिळनाडू व केरळमधील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या भागातील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. चेन्नई, कन्याकुमारी, मदुराई आणि अन्य शहरांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. वादळात सुमारे एक हजार मच्छिमार बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. मात्र सरकारी यंत्रणांनी फक्त १८ मच्छीमार बेपत्ता असल्याच्या वृत्तालाच दुजोरा दिला आहे.

UPDATES:

* लक्षद्वीप बेटांवर लाटांचा जोर वाढला

* त्रिवेंद्रम येथे वादळी वाऱ्यात फसलेल्या आठ जणांची सुटका.