वस्तू आणि सेवा करातून मिळणाऱ्या महसूलात जवळपास १० टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये सरकारला जीएसटीमधून ९२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र ऑक्टोबरमध्ये सरकारला ८३ हजार ३४६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जुलै महिन्यापासून जीएसटी लागू झाल्यानंतर सरकारला पहिल्या तीन महिन्यांमध्ये ९० हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला होता. मात्र ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच सरकारच्या महसुली उत्पन्नात घट झाली आहे.

व्यापारी आणि दुकानदार स्वत:हून जाहीर केलेल्या उत्पन्नावर करभरणा करत असल्याने जीएसटी घटल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. यासोबतच करांमध्ये कपात करण्यात आल्याचा परिणामही जीएसटीवर झाल्याचे अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये एकीकृत जीएसटी लागू होत असल्यानेही सरकारला जास्त उत्पन्न मिळाले होते. या तीन महिन्यांमध्ये राज्य आणि केंद्राचा जीएसटी एकत्रितपणे लागू होत होता.

‘सध्याच्या घडीला देशातील जीएसटी अंतर्गत करभरणा करणाऱ्यांची संख्या ९५.९ लाख इतकी आहे. यातील १५.१ लाख कम्पोजिशन डिलर्स असून त्यांना दर तीन महिन्यांनी कर भरावा लागतो. ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत ५०.१ लाख व्यापारी आणि दुकानदारांनी जीएसटी भरला आहे,’ अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. ‘ऑक्टोबरमधील सरकारचे उत्पन्न घटले असले, तरी त्याबद्दल फार चिंता करण्याचे कारण नाही. निर्यातदारांना रिफंड आणि उद्योजकांना क्रेडिट देण्यात आल्याने उत्पन्नात घट झाल्याचे दिसत आहे. याशिवाय या महिन्यात करांमध्येही कपात करण्यात आल्याने महसुली उत्पन्न कमी झाले,’ असे विश्लेषण प्राईसवॉटरहाऊसच्या प्रतीक जैन यांनी केले.

एक जुलैपासून देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाली. या महिन्यात सरकारला जीएसटीमधून ९५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर ऑगस्टमध्ये महसुली उत्पन्नात ४ हजारांची घट पाहायला मिळाली. या महिन्यात सरकारला ९१ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले. यानंतर सप्टेंबरमध्ये सरकारला ९२ हजार १५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर ऑक्टोबरमध्ये सरकारचे उत्पन्न जवळपास १० टक्क्यांनी घटले आहे. जीएसटी लागू झाल्यापासून पहिल्यांदाच सरकारचे उत्पन्न ९० हजार कोटी रुपयांच्या खाली आले आहे.