स्वयंसेवकांकडून अकारण त्रास सहन केला जाणार नाही – बस्सी
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आखलेल्या सम-विषम प्रयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीच राज्य सरकार आणि दिल्ली पोलिसांमध्ये खणाखणी सुरू झाली आहे.
राज्य सरकारने लोकजागृतीसाठी नेमलेल्या दहा हजार स्वयंसेवकांनी नियमांचे पालन करावे. कुणालाही अकारण त्रास दिल्यास सहन केले जाणार नाही, अशी तंबी पोलीस अधीक्षक भीमसेन बस्सी यांनी दिली आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या या स्वयंसेवकांना अप्रत्यक्षपणे बस्सी यांनी धमकीच दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया म्हणून दिल्लीच्या ईस्ट पटेलनगर भागातील पक्षाच्या मुख्यालयात निवडक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान स्वयंसेवकांसाठी मार्गदर्शिका निश्चित करण्यात आली आहे.
सम-विषम प्रयोगाची अभिनव संकल्पना येत्या १ जानेवारीपासून राबविण्यात येईल. सम तारखेला सम तर विषम तारखेला विषम क्रमांकाची वाहने रस्त्यावर धावतील, असा नियम राज्य सरकारने केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून अॅप, वृत्तपत्रांद्वारे जाहिरात, व्हॉट्सअॅपवरून जागृती केली जात आहे. १ ते १५ जानेवारीपर्यंत हा नियम लागू असणार आहे. त्यासाठी दहा हजार स्वयंसेवकांना सक्रिय करण्यात येणार आहे.
हे स्वयंसेवक मोक्याच्या ठिकाणी, सिग्नलजवळ उभे राहून वाहनचालकांना नियम समजावून सांगतील. कुणी नियम मोडणार असेल तर त्यांना पुष्पगुच्छ देण्याची ‘गांधीगिरी’ करण्यात येईल, परंतु या प्रयोगादरम्यान कुणाही वाहनचालकास त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना ‘आप’नेत्यांनी स्वयंसेवकांना दिला आहे.
सरकारने पक्षीय पातळीवरून या नियमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांची मदत न घेण्याचा निरोप बस्सी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. या प्रयोगाच्या अंमलबजावणीत दिल्ली पोलीस व केंद्र सरकारची मदत मिळण्याची आशा नसल्यानेच केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांची मदत घेतली. परंतु दिल्ली पोलिसांनी वाहतुकीला अडथळा तसेच चालकांना विनाकारण त्रास देणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिल्ली पोलिसांनी दिल्याने सरकार व दिल्ली पोलिसांमध्ये संघर्षांची स्थिती निर्माण झाली आहे.