अनेक जणांच्या टीकेची धनी झालेली दिल्लीतील सम-विषम तारखांना चारचाकी गाड्या रस्त्यावर आणण्याची योजना अखेर मार्गी लागली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व मंजुऱ्या मिळाल्या असून, एक जानेवारीपासून ही योजना दिल्ली-एनसीआरमध्ये अंमलात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. सोमवारी दिल्ली सरकार याबाबतचा शासकीय आदेश जारी करेल.
सोमवार ते शनिवार सकाळी आठ ते रात्री आठ या काळात ही योजना लागू राहणार असून, नियम मोडणाऱ्यांकडून दोन हजाराचा दंड वसूल करण्यात येणार आहे. दिल्लीसह इतर राज्यांमधून नोंदणी झालेल्या गाड्यांनाही हा नियम लागू राहणार आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सरन्यायाधीश, राज्यपाल, विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या वाहनांना या नियमातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर लष्करी वाहने, एसपीजी सुरक्षेसंबंधीच्या वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे बंब, पोलिसांची वाहने यांच्यासाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे.
प्रायोगिक तत्त्वावर एक ते १५ जानेवारी या काळात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.