पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारी रोजी ओडिशामधील बालागीर जिल्ह्याला भेट देणार आहेत. मात्र मोदींच्या या भेटीसाठी चक्क हजार झाडांचा बळी द्यावा लागल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तत्पुरत्या स्वरुपाचे हेलिपॅड बनवण्याच्या उद्देशाने एक हजार झाडे कापण्यात आली आहेत. १३ जानेवारी रोजी ही सर्व झाडे कापून तेथे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी मोकळे मैदान तयार करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या जागेवरील झाडे कापण्यात आली आहेत ती जागा रेल्वेच्या मालकीची आहे. शहरातील वनक्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने २०१६ साली केलेल्या वृक्षारोपण मोहिमेदरम्यान ही झाडे लावण्यात आली होती. मात्र मोदींच्या दौऱ्याआधी हेलिपॅड तयार करण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने सव्वा हेक्टर जागा रिकामी करण्यात आली आहे. यासाठी वनखात्याकडून कोणतीही परवाणगी न घेता हजार झाडे कापण्यात आल्याचे वृत्त ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने दिले आहे.

यासंदर्भात बालगीरचे प्रभागीय वनाधिकारी समीर कुमार सत्पथी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. वृक्ष तोड झाल्याचे वृत्त खरे आहे. तसेच ही वृक्षतोड करण्याआधी आमच्याकडून कोणत्याही प्रकारची परवाणगी घेण्यात आली नव्हती असंही सत्पथी यांनी सांगितले आहे. याप्रकरणी वनखात्याने रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली असता सुरक्षेच्या दृष्टीने अचानकच ही झाडे कापण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणाची चौकशी आता वनविभागाने सुरु केली आहे. वनविभागाने रेल्वे प्रशासनाकडून ही झाडे का पाडण्यात आली यासंदर्भात लेखी माहिती मागवली आहे.

मोदींचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडसाठी कापडण्यात आलेली झाडे ही चार ते सात फूट उंचीच होती. एकूण कापलेल्या झाडांची संख्या हजारहून अधिक असून ती १२०० पर्यंत जाण्याची शक्याता असल्याचे सत्पथी म्हणाले. तर स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हजार १२०० नाही तर तीन हजार झाडे कापण्यात आली आहेत.

संबंधित खात्यांचे आरोपप्रत्यारोप

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी आपले हात झटकले आहेत. अशाप्रकारे हेलिपॅड बनवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असल्याचे सांगत रेल्वेने हा प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पूर्व रेल्वेचे प्रवक्त्यांनी ‘हेलिपॅड बांधण्याचे काम राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग करतो. रेल्वे मार्फत अशाप्रकारचे कोणतेही काम केले जात नाही’ अशी माहिती दिली. तर दुसरीकडे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी जे लोक मोदींच्या ओडिशा भेटीला घाबरत आहेत त्यांनी वनअधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत या बातम्या परसवरल्या जात असल्याचा आरोप केला आहे.